Sunday, August 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik APMC News : बाजार समितीत मूलभूत सुविधांचा बोजवारा; प्रशासकीय कारभारामुळे निर्णयांना...

Nashik APMC News : बाजार समितीत मूलभूत सुविधांचा बोजवारा; प्रशासकीय कारभारामुळे निर्णयांना विलंब, शेतकरी बेहाल

 पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati 

दररोज हजारो शेतकऱ्यांची (Farmer) वर्दळ असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (Nashik APMC) परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सध्या बाजार समितीचा कारभार प्रशासकांच्या हाती असल्याने धोरणात्मक व दैनंदिन निर्णयप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे.परिणामी, विविध कर आणि शुल्क भरूनही शेतकऱ्यांना कचरा, चिखल आणि असुविधांच्या चक्रव्यूहात अडकावे लागत असून, प्रशासकीय दिरंगाईमुळे बळीराजाच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.

- Advertisement -

बाजार समिती परिसरात दररोज शेतमालाची (Agricultural Produce) मोठी आवक होते. मात्र, कचऱ्याच्या नियमित विल्हेवाटीअभावी भाजीपाल्याचा कुजलेला भाग, प्लास्टिकचा साठा आणि साचलेले दूषित पाणी यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे (Potholes) आणि चिखलामुळे वाहने चालवणे तर दूरच, पायी चालणेही मुश्कील झाले आहे. याशिवाय अपुरी व अस्वच्छ स्वच्छतागृहे तसेच पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यामुळे शेतमाल विक्रीसाठी तासन्‌तास थांबणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

प्रशासकीय राजवट; समस्यांवर निर्णयांचा खोळंबा?

सरकारने (Government) बाजार समितीवर लोकप्रतिनिधीचे अधिकार निष्प्रभावित केले असून कुंदन भोळे ह्यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती केलेली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणींवर तातडीने निर्णय घेण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. स्वच्छता राखणे, रस्त्यांची डागडुजी करणे आणि मूलभूत सुविधा पुरवणे याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

करांची वसुली नियमित, मग सुविधा का नाहीत?

बाजार समिती प्रशासनाकडून शेतमाल विक्री व प्रवेशाच्या नावाखाली विविध शुल्क व कर नियमित वसूल केले जातात.मात्र, त्या तुलनेत साध्या मूलभूत सोयी-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. असुविधांमुळे शेतमाल उतरवणे, मांडणे आणि विक्री करणे यात शेतकऱ्यांचा नाहक वेळ आणि श्रम वाया जात असून, याचा थेट फटका त्यांच्या उत्पन्नावर बसत आहे.

ठोस उपाययोजनांची तातडीने गरज

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळणे हा शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने कागदी कारभारातून बाहेर पडून बाजार समिती परिसरातील अस्वच्छता दूर करावी, रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

 बाजार समिती परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न केवळ आजचा आहे का? या संदर्भात आम्ही काळजी घेऊ संबंधित विभागाला निर्देशित करून साफ सफाई स्वच्छता राखली जाईल.

 कुंदन भोळे प्रशासक, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

उत्तर महाराष्ट्राची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सध्या घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून पायाभूत सुविधांची अत्यंत बिकट दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी साचलेला कचरा, दुर्गंधी, चिखल आणि पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहांचा अभाव यामुळे येथे येणारे शेतकरी, व्यापारी आणि नागरिक हैराण झाले आहेत. लाखो रुपयांचा महसूल मिळूनही प्रशासनाचे या दुरवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने त्वरित या परिसराची स्वच्छता करून मूलभूत सुविधांची दुरुस्ती करावी.

किरण बापू पानकर, शहर कार्यध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक शहर

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Pune Railway : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गासाठी चक्काजाम आंदोलन;...

0
सिन्नर | Sinnar नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा (Nashik-Pune High Speed Railway) मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी आज (दि.०९ ऑगस्ट) क्रांती दिनाचे औचित्य साधून...