Sunday, August 30, 2026
HomeनाशिकNashik News : कनसरा माता चौकात एमएनजीएलची गॅस पाइपलाइन फुटून आगीचा भडका;...

Nashik News : कनसरा माता चौकात एमएनजीएलची गॅस पाइपलाइन फुटून आगीचा भडका; मोठा अनर्थ टळला

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati 

- Advertisement -

म्हासरूळ-मखमलाबाद लिंक रोडवरील कनसरा माता चौकात (Kansara Mata Chowk) बुधवारी (ता. ५) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भुयारी गटाराचे खोदकाम सुरू असताना ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ची मुख्य गॅस पाइपलाइन अचानक फुटली. पाइपलाइन फुटल्यानंतर काहीच वेळात आगीचा मोठा भडका उडाल्याने नित्य वर्दळीच्या या रस्त्यावर वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये (Citizen) प्रचंड घबराट पसरली. सुदैवाने, अग्निशामक दलाने दाखवलेली तत्परता आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

पंचवटी विभागात (Panchvati Division) रस्ते काँक्रिटीकरण, ड्रेनेज लाईन, स्मार्ट सिटी आणि युटिलिटीची विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवरील साई संदेश चौकाजवळ रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणार्‍या भुयारी गटाराच्या चेंबरचे खोदकाम सुरू होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हे काम सुरू असताना एमएनजीएलची पाइपलाइन अचानक गळती होऊन फुटली.

गॅस (Gas) लिकेज झाल्यानंतर पुढील एक तासाच्या अंतराने अचानक हवेत आगीचा प्रचंड भडका उडाला. आगीच्या ज्वाळा पाहून रस्त्यालगत असलेले भाजीपाला-फळ विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांची पळापळ झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून एका सुजाण नागरिकाने तातडीने प्रभाग क्रमांक एकमधील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. लोकप्रतिनिधींनी लागलीच पंचवटी अग्निशामक केंद्राला पाचारण केले. प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, फायरमन गणेश रकीबे, सिद्धार्थ गोतीस, संकेत वैष्णव व वाहनचालक अशोक सरोदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रभाग एकचे नगरसेवक प्रवीण जाधव, नगरसेविका रंजना भानसी, दिपाली गीते, रुपाली नन्नावरे यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला. एकीकडे केंद्र सरकार (Centre Government) एमएनजीएल गॅस जोडण्या वाढवण्याबाबत निर्देश आणि सूचना देत आहे, मात्र दुसरीकडे योग्य समन्वयाअभावी होणाऱ्या अशा अपघातांमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

सदर घटना दुपारी घडल्यानंतर जवळपास एक तास गॅस गळती होत होती. त्यानंतर अचानक गॅसचा भीषण भडका उडाला. हा भडका इतका भयावह होता की रस्त्यावरील झाडांच्या सर्व फांद्या करपून गेल्या. धोका ओळखून आम्ही आमच्या हॉटेलमधील गॅस टाक्या व इतर महत्त्वाचे साहित्य तत्काळ सुरक्षित स्थळी हलवले.

 विजय दंडवते, प्रत्यक्षदर्शी व व्यावसायिक

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी संबंधित ठेकेदाराने योग्य ती दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

रुपाली ननावरे, नगरसेवक



ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगरमध्ये 1 लाख 90 हजार जात प्रमाणपत्रांचे वाटप

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या तीन वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यात कुणबी व कुणबी-मराठा नोंदी शोधणे आणि त्याआधारे जात प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेने मोठा वेग घेतला आहे. 24 ऑक्टोबर...