Tuesday, April 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBhagat Singh Koshyari : "राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच..."; माजी राज्यपाल कोश्यारींनी मनसे...

Bhagat Singh Koshyari : “राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच…”; माजी राज्यपाल कोश्यारींनी मनसे अध्यक्षांना डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | Nashik

दोन दिवसांपूर्वी मुंबईत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात संघाची (RSS) भूमिका, कार्यपद्धती आणि समाजातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमास चित्रपटसृष्टीतील काही नामांकित कलाकारांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष वेधले गेले. यावेळी सरसंघचालक भागवत यांनी भाषिक आधारावर भेदभाव करणे हा स्थानिक आजार असल्याची टिप्पणी केली होती . त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांना रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका टिप्पणी करू नका असे म्हणत चांगलेच सुनावले होते. यावर आता महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना डिवचले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “जी लोक संघाच्या कार्यक्रमाला आली ती सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. मी राज ठाकरेंचा खूप सन्मान करतो. मात्र, मला वाटतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) जास्तच घाबरले आहेत. मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. जसे प्रभू श्रीरामाला सर्व समान होते तसेच नरेंद्र मोदींना देखील सर्व जण समान आहेत. राज ठाकरे माझ्या लहान भावासारखे आहे. ते खूप चांगले, कडक नेते आहे. त्यांना मी सांगू इच्छितो मोदींना घाबरू नका, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहात, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. घाबरायचे असेल तर चुकीच्या कामांना घाबरा”, असा सणसणीत टोला कोश्यारी यांनी राज ठाकरेंना लगावला.

पुढे ते म्हणाले, “नाशिकमध्ये (Nashik) चाळीस वर्षांपूर्वी मी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे देखील आलो होतो. मोठ्या प्रमाणवर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यामुळे मी देखील आज एक भक्त म्हणून आलो आहे. राज्यपाल असताना देखील मी नाशिकला आलो होतो, अशा आठवणी जागवत कोश्यारी यांनी ज्याप्रमाणे अयोध्येत कॉरिडॉर झाला, तसा याठिकाणी देखील झाला पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होतं?

८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !

असो . . . मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे.

ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?

मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?

संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा. आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !

राज ठाकरे ।

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अविनाश शिंदे हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप; अकरा लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik इंदिरानगर भागातील (Indiranagar Area) बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध 'सुपर ग्राहक बाजार'चे मालक अविनाश शिंदे यांच्या निघृण हत्या आणि लूट प्रकरणाचा...