Wednesday, June 17, 2026
HomeनाशिकImtiaz Jaleel : सिंहस्थासाठी २५ हजार कोटी खर्च करणे योग्य आहे का?...

Imtiaz Jaleel : सिंहस्थासाठी २५ हजार कोटी खर्च करणे योग्य आहे का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा नाशिकमधून सवाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारत हा विविध जाती-धर्मांचा देश असताना एका विशिष्ट धर्माच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच सिंहस्थासाठी तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा खर्च शासनाकडून करण्यात येत आहे. हे योग्य आहे का? असा थेट सवाल एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये (Nashik) झालेल्या सभेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

यावेळी जलील म्हणाले, आतापर्यंत भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांकडून अल्पसंख्याक समाजावर हल्ले झाले, मारहाणीचे प्रयत्न झाले. आता मात्र सिंहस्थाच्या नावाखाली तपोवन परिसरातील हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. या वृक्षतोडीला नागरिकांनी एकजुटीने विरोध केला असून, या लढ्यासाठी नाशिककरांचे (Nashik) त्यांनी जाहीर अभिनंदन केले. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या वतीने जुने नाशिक येथील चौक मंडई येथे जलील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, काँग्रेससह भाजप व इतर सर्व पक्षांनी आतापर्यंत अल्पसंख्याक समाजाची मते घेऊन वापरून घेतले. मात्र, त्या समाजाला काहीच दिले नाही. आता आम्ही जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहोत, असे त्यांनी म्हटले.तसेच नाशिक महापालिकेत एमआयएमचे नगरसेवक निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी नाशिककरांना केले.

दरम्यान, नाशिकमध्ये आगमनानंतर इम्तियाज जलील यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. यावर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, मला नाशिकमध्ये येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांना (Police) सांगून मला वाहतूककोंडीत अडकवण्यात आले, त्यामुळे मला तब्बल दीड तास उशिरा सभेत यावे लागले. ही पहिलीच सभा असून, यानंतर आम्ही हेलिकॉप्टरने नाशिकला येऊन सभा घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

मोदींची नक्कल

रात्री साडेनऊच्या सुमारास जलील यांचे सभास्थळी आगमन झाले. दहा वाजण्यास काहीच मिनिटे शिल्लक असल्याने ‘आता टेस्ट किंवा वन-डे न खेळता थेट टी-टेंटी खेळायला आलो आहे,’ असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.

राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत

राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनी मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (Congress) पुढे केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेले मत म्हणजे थेट भाजपलाच दिलेले मत आहे, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला. यावेळी एमआयएमचे नाशिक शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

‘अहिल्यानगरची चिकनी चमेली’ उल्लेख

अल्पसंख्याक समाजावर सातत्याने हल्ले होत असून, सत्तेतील मंत्रीही मुस्लिमांना टार्गेट करत असल्याचा आरोप जलील यांनी केला. पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासह आम्ही कोल्हापूर दौऱ्यावर गेलो असता आम्हाला रोखण्यात आले, मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर सभा झाली. त्यानंतर अहिल्यानगरमध्येही सभा घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता ‘चिकनी चमेली’ असा उल्लेख करत आमच्यावर सातत्याने टीका केली जात आहे, मात्र आता जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...