नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्यासह देशात अराजकता, टेरर फंडिंग, बॉम्बस्फोट, दहशतवाद पेरण्याप्रकरणांत एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या छापेमारी (Raids) व कारवायांत नाशिकमधून (Nashik) बहुतांश दहशतवादी व प्रतिबंधित संघटनांचे सदस्य पकडले आहेत. जुलै २०२५ मध्ये सातपूर भागातून एनआयएच्या कोलकाता युनिटने छापेमारी करून पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबादला झालेल्या बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यास अटक केली. अशातच मागील काही महिन्यांत नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City) तेराहून अधिक अवैध बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यामुळे दहशतवादी व अवैध बांगलादेशी नाशिकमध्ये वारंवार घुसखोरी करत असल्याने त्यांच्यासाठी नाशिक हे ‘हब’ झाले आहे.
त्यातच, शहर पोलिसांच्या नाकाखाली दहशतवाद्याने (Terrorists) मुक्काम ठोकल्याची खबरही गुन्हे पथकांना नव्हती, असे पुन्हा अधारेखित झाले आहे. सन २०१० मध्ये दहशतवादी बिलाल शेख याला मुंबई एटीएसच्या (Mumbai ATS) पथकाने अटक केल्यानंतर मोठा कट उघडकीस आला होता. त्याने नाशिक शहरातील देवळाली आर्टीलरी, पोलीस आयुक्तालय, एचएएल, एमपीएची रेकी करून बरीच माहिती कुख्यात दहशतवादी अबू जिंदाल यास पुरविली होती असे उघड झाले होते. त्याचवेळी एटीएसने शेख लालबाबा ऊर्फ बिलाल याला सातपूरमधून अटक केली होती. त्यामुळे तेव्हा हा खटला नाशिकच्या विशेष न्यायालयात चालला. हे प्रकरण घडल्यावर हिमायत बेग याला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आली.
तसेच, मालेगाव, सातपूर, देवळाली भागात एटीएसने गोपनीय माहिती व विश्लेषणानुसार कारवायांचा धडाका सुरुच ठेवला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये एनआयए व एटीएसने मालेगावात (Malegaon) छापासत्र राबविले. त्यात जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेला अर्थपुरवठा केल्याच्या संशयावरून मालेगावात छापा टाकून होमिओपॅथी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले होते. त्यात त्याची तब्बल १२ तास चौकशी केली व त्याच्यासह पत्नीचे मोबाईल फोन जार करुन एनआयए कार्यालयात हजर राहण्याची ताकिद दिली होती. असे असतानाच, २०२३ मध्ये महाराष्ट्र एटीएस ब एनआयएने मालेगावातील पीएफआय (पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया) संघटनेच्या सदस्यांबर छापेमारी करून कारवाई केली.
दरम्यान, यानंतर, जानेवारी २०२४ मध्ये नाशिक एटीएसने (Nashik ATS) तिडके कॉलनीतून हुसैफ अब्दुल अजीज शेख या इंजिनिअरला सिरिया, अफगणिस्तान व इतर देशांतील काही हस्तकांना नाशकातून ‘टेरर फंडिंग’ केल्यासंदर्भात अटक केली होती. आयएसआय व इसीस यांसह अन्य प्रतिबंधित दहशतवादी संघटनांना थेट पैसे पाठवून त्याने विदेशवारी केल्याचेही समोर आले. तर, दरम्यान, पीएफआय संदर्भान नाशिकसह मालेगावमध्ये एटीएस व एनआयएने सर्वाधिक छापे टाकले आहेत.
शहर पोलीस, गोपनीय शाखेचे अपयश
‘एनआयए’ ने शहर पोलिसांना सहकार्याचे प्रशंसा पत्रक दिले पण, एका उबशिक्षित दहशतवाद्याच्या नाशिकमधील मुक्कामाबाबत कानावर हात ठेवले आहेत. पथकाने छाप्याबाबत कोणतीही कल्पना नाशिक पोलिसांना दिली नसावी. परंतु, ‘एनआयए’ने दीड महिन्यांनी शहर पोलिसांना प्रशस्तीपत्र पाठविले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी युनिट एकचा सत्कार केला असून, पोलिसांनीही स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. त्यातच ‘एनआयए’ चे पथक पश्चिम बंगलावरून नाशिकमध्ये आले. तेव्हा नाशिक शहर व जिल्हा पोलीस, दहशतवादी विरोधी पथक, राज्य गुप्तवार्ता विभागासह स्थानिक गोपनीय शाखा अनभिज्ञ असल्याचे आता समोर येत आहे.
भाडेकरींचा मुद्दा
शहरात नेमके किती भाडेकरू राहतात, त्यांचा पूर्वातिहास, याबाबत पोलीसांकडे माहितीचा अभाव आहे. भाडेतत्वाने राहणाऱ्या प्रत्येकाची माहिती संकलित करण्याचे आदेश असताना याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. लाखो भाडेकरूंची कागदोपत्री माहिती अद्यापही पोलिसांपर्यंत नसून आतातरी भाडेकरूंची इत्थंभूत माहिती पोलिसांकडे अपडेट असणे गरजेचे आहे. तसेही, ‘येरे माझ्या मागल्या अन् शिळ्या भाकन्या चांगल्या हे सुरूच आहे.





