नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इगतपुरीतील (Igatpuri) समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचाराची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी संजय शिंदे यांनी बुधवारी (दि.४) संबंधित वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थी, पालक, प्रशासनाची संवाद साधला. याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल त्यांनी प्रशासनाला सादर केला आहे.
इगतपुरी येथील वसतिगृहातील अल्पवयीन मुलांवर (Boys) गुंगीच्या गोळया देऊन अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संजय शिंदे यांनी या वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थी, पालक, प्रशासनाची संवाद साधला. याबाबत प्राथमिक चौकशी अहवालात प्रामुख्याने उच्चस्तरीय चौकशी करण्याची शिफारस केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत याची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी बुधवारी सकाळी वसतिगृहाला भेट दिली. त्यावेळी वसतिगृह बंद होते, दहावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना घरी काढून दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाने विद्यार्थ्यांना बोलावून घेतले. यानंतर सदर प्रकाराबाबत विद्यार्थ्यांसमवेत चर्चा केली. यात बहुतांश विद्यार्थी बोलण्यास घाबरत होते. परंतू, शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमाने समाजावून सांगत झाल्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी अनैसर्गिक अत्याचार होत असल्याचे नमूद केल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, सदर प्रकणाबाबत वसतिगृह अधिक्षक यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला असला तरी, समाजकल्याण विभाग, जिल्हा प्रशासनाला अंधारात ठेवले. त्यांना कळविणे आवश्यक होते. परंतू, तसे कळविले नसल्याची गंभीर बाब समोर आली. वसतिगृहाची दिवसभर चौकशी करून जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिंदे यांनी प्राथमिक चौकशी अहवाल तयार केला. यात, वसतिगृहातील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, चौकशी कार्यकाळात वसतिगृह बंद ठेवण्यात यावे, यासह वसतिगृहातील अनेक त्रुटी निर्देशनास आणून दिल्या.
वसतिगृहाला भेट देऊन प्राथमिक अहवाल तयार करून तो सादर केला आहे.
- डाॅ. संजय शिंदे (प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी)
समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळेत घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे. याबाबत पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. बाल संरक्षण समितीलाही याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी भेट देऊन चौकशी केल्यानंतर उच्चस्तरीय चौकशी समितीपर्यंत हा अहवाल जाईल. याबाबत अधिक्षकावरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने या प्रकरणाची त्वरित दखल न घेता बाहेरगावी निघून गेल्यामुळे तोही दोषी आहे. आश्रम शाळांमध्ये गुडटच, बॅडटच उपक्रम राबविण्याची गरज आहे.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी





