
नाशिक | Nashik
महानगरपालिकेच्या आनंदवली येथील शाळा क्रमांक १८ मधील उपशिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव (Kunda Bachhav) यांना आज (शनिवार दि.०५) रोजी शिक्षक दिनानिमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील (Maharashtra) एकूण चार शिक्षकांना (Teachers) या वर्षी हा मानाचा पुरस्कार मिळाला असून, त्यात कुंदा बच्छाव यांच्या उल्लेखनीय कार्याचा समावेश आहे.
उपक्रमशीलतेतून बदलला शिक्षणाचा चेहरामोहरा
सन २००५ मध्ये इगतपुरीच्या (Igatpuri) दुर्गम भागातून शिक्षकी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कुंदा बच्छाव यांनी २०१४ मध्ये आनंदवली शाळेत सूत्रे हाती घेतली. केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले.
ज्ञानभिंती उपक्रम : लोकसहभागातून गावातील (Village) घरांच्या भिंतींवर नकाशे, गणिताची सूत्रे व इंग्रजी शब्द रंगवले. त्यामुळे मुले मोबाईल गेम सोडून भिंतीवरील कोडी सोडवू लागली.
तरंग वाचनालय व स्मार्ट स्कूल : सुमारे ५०० पुस्तकांचे (Books) वाचनालय उभारले. लोकसहभागातून शाळा ‘स्मार्ट व मॉडेल स्कूल’ बनवत स्मार्ट अटेंडन्स, संविधान सापशिडी आणि मूल्यमापन शिडी हे उपक्रम सुरू केले.
प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण : विद्यार्थ्यांना (Student) बँक, बाजार, वृद्धाश्रम, इस्रो (ISRO) आणि विधानभवनाला भेटी देऊन विमानप्रवासाचा अनुभव मिळवून दिला. तसेच ‘रेडिओ केंद्र’ आणि नाट्याधारित शिक्षणातून वर्गखोलीला प्रयोगाची शाळा बनवले.
‘आनंदवलीची सावित्री’ म्हणून ओळख
मुलींच्या शिक्षणासाठी बच्छाव यांनी ‘शैक्षणिक पालकत्व राबवत एक हात मदतीचा’ या उपक्रमाद्वारे १५० हून अधिक मुलींना शैक्षणिक आधार दिला. ज्यामुळे बालविवाहांना आळा बसला. सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालवणाऱ्या या कार्यामुळे त्यांना परिसरात ‘आनंदवलीची सावित्री’ म्हणून आदराने ओळखले जाते. कुंदा बच्छाव यांच्या या राष्ट्रीय बहुमानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




