नाशिक । प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दरेवाडी-लोणवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने तत्काळ दुरुस्त झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुरळीत सुरु झाला असल्याचे, सरपंच अविनाश पाटील-झोले यांनी सांगितले.
दरेवाडी-लोणवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी खराब झाल्याने या परिसराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. परिसरातील पाच ते सहा वाड्यावरील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी रोज दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते.
या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे आदेश दिले. तहसीलदार दीपक गिरासे यांनी दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला. आता महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली असून महिलांनी याबाबत समाधान व्यक्त केले असल्याचेही श्री. पाटील-झोले यांनी सांगितले.
दरेवाडी लोणवाडी येथील पाणीप्रश्नाबाबत स्थानिक प्रशासनाशी सपंर्क साधून जलवाहिनी दुरुस्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याने तेथील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्यास प्रशासनला यश आले असल्याचे मत, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी व्यक्त केले.




