पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक शहरातील (Nashik City) समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी महापौर व उपमहापौर यांनी प्रभाग दौर्यास सुरूवात केली. प्रभाग क्रमांक एकपासून (म्हसरूळ) या उपक्रमास प्रारंभ झाला. स्थानिक नगरसेवकही सोबत होते. या दौर्यास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी रणरणत्या उन्हात महापालिका प्रशासनावर समस्यांचा पाऊसच पाडला. लोकप्रतिनिधींनीही काळजीपूर्वक समस्या जाणून घेतल्या. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना या दोघांसह नगरसेवकांनी धारेवर धरले. महापौरांनी बहुतेक बाबींवर तात्काळ तोंडी आदेश दिले, तर काहींबाबत त्यांनी प्रशासकीय पाठपुरावा करून लवकरात लवकर समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.
महापौर हिमगौरी आहेर-आडके (Mayor Himgauri Aher-Adke) उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी सकाळीच म्हसरूळला आले. त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेविका व माजी महापौर रंजना भानसी, नगरसेवक प्रवीण जाधव, नगरसेविका दीपाली गिते होते. यावेळी महापौरांनी काही निर्णय जागेवरच घेतले. ते प्रभाग एकच्या अनुषंगाने घेतले तरी ते धोरणात्मकदृष्ट्या पूर्ण शहरासाठीच लागू होऊ शकतात. यात अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांच्या रोटेशनने बदल्या करण्यात येतील. तसेच स्वच्छता विभागातील कायम कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या कामांचा तुलनात्मक आढावा घेण्यात येईल. ते प्रभागातील कार्यस्थळी अनुपस्थित असल्याच्या तक्रारी आल्याने त्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येईल. महापालिकेत समाविष्ट २३ खेड्यांसाठी खेडे विकास निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करणे, काॅलनी रस्ते चांगले करण्यात येतील. पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिनीचे काम पूर्ण झाल्यास तीन ते सहा महिन्यांत पाणीप्रश्न सुटेल, असे सांगण्यात आले.
तसेच म्हसरूळच्या प्राचीन सीता सरोवराचा विकास करू व महापालिका शाळेच्या इमारतीची दूरावस्था झाल्याने नवीन इमारत बांधण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याप्रमाणे सद्यस्थितीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी फक्त प्रभाग एकसाठी खास एक टॅकर पूर्ण वेळ सेवा देईल. आडगाव, वरवंडी, दिंडोरी रोडचे रुंदीकरण करण्याचे ठरविण्यात आले. महापालिका शाळेतील आधार केंद्राला महापालिकेच्या संबधित परवानग्या दाखविता न आल्याने व तसेच फूड लायसन्स काढून देण्यासारख्या सुविधा अशा केंद्रातून देऊ शकत नाही, असे सांगून महापौरांनी हे केंद्र तात्काळ बंद करण्यात सांगितले. आधार केंद्र चालकानेही ते तात्काळ कुलूपबंद केले. खरे तर, महापालिकेचे (Mahapalika) प्रशासन दीर्घकाळ लोकप्रतिनिधींकडून चालविले गेले. त्यामुळे नागरिकांकडून जलतरण तलाव, क्रीडा संकुल अशा विशेष सुविधांची मागणी प्रभागासाठी अपेक्षित होती. मात्र, मुलभूत सुविधांचाच वाणवा पुढे आला. शहराच्या उशाला धरण, पण पाणी टंचाईचा सामना आहेच. काॅलनी रस्ते खराब, ठिकठिकाणी साचलेला कचरा, अतिक्रमण, शाळा इमारतीची दूरवस्था, भकास उद्याने या समस्या मांडण्यात आल्या. यावर लोकप्रतिनिधींनीही गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीकडे बोट केले. मात्र, आता आम्ही आलो आहोत, तर समस्या सोडवू, असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी सुमारे चार तास दौरा केला. कुलकर्णी उद्यान, ओमकारनगर, सीता सरोवर, भाजी बाजार, महापालिका शाळा, रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील काॅलनीस त्यांनी भेटी दिल्या.
आधार केला बंद
म्हसरूळच्या महापालिका शाळा क्रमांक एकच्या इमारतीत आधार केंद्र सुरू होते. त्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यामुळे महापालिकेचा ताफा त्या केंद्रात हजर झाला. यावेळी या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या मंजुरीची परवानगी पत्र दाखविता आले नाही. तसेच तेथे फूड लायसन्ससारखी सरकारी कागदपत्रे काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काही कारणच नाही, असे महापौर व उपमहापौरांनी सांगितले. यावर महापौरांनी हे केंद्र तात्काळ बंद करण्यास सांगितले अन् काही मिनिटांत तेथील कर्मचाऱ्यांनी स्वतःहून या केंद्राला कुलूप लावले. काही नागरिकांनी आता आम्ही रांगेत आहोत, तर आजच्या दिवस केंद्र सुरू राहू द्या, अशी विनंती महापौरांना केली. मात्र, महापौरांनीही त्यास ठामपणे नकार दिला व परवानगी सादर करू न शकणार्या केंद्रातून नागरिकांनीही कागदपत्रे काढू नये, असे सांगितले.
माजी महापौरांनी महापौरांसमोर मांडल्या समस्या
प्रभाग क्रमांक १ मधील विविध नागरी समस्यांबाबत माजी महापौर व येथीलच विद्यमान नगरसेविका रंजना भानसी यांनी सध्याच्या भाजपच्या महापौर हिमगौरी आडके यांच्यासमोर कैफियत मांडली. रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी मूलभूत प्रश्नांबाबत त्यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे रंजना भानसी स्वतः महापौर पदावर असताना देखील याच समस्या याच प्रभागात होत्या.
नागरिक किती आमच्यापर्यंत येणार? म्हणूनच आम्ही लोकांपर्यंत पोहचत आहोत. सोबत महापालिकेचे अधिकारी आहेत. या दौर्यात समस्यांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.
हिमगौरी आहेर-आडके, महापौर
प्रशासकीय राजवटीत नागरिकांचा अपेक्षाभंग झाला. लोक कर भरतात, पण त्यांना प्रशासकीय काळात सुविधा नाही. आता लगेच आमचा सत्कार न करता, कामे संपल्यावरच करा.
विलास शिंदे, उपमहापौर
समस्या खूप आहेत. पालापाचोळा उचलला जात नाही. उद्यानांची स्वच्छता नाही, काॅलनी रस्ते खराब आहेत. अवेळी पाणीपुरवठा होतो. याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. समस्या सोडवूनच घेऊ.
प्रवीण जाधव, नगरसेवक





