मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय प्रशांत हिरे (Advay Hiray) हे समितीच्या सात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याचे सिद्ध होऊन तसेच रजा मंजुरीसाठी राज्य कृषि उत्पन्न खरेदी-विक्री नियम तरतुदीचे अनुपालन झाले नसल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलानी (Faiyaz Mulani) यांनी हिरे यांचे बाजार समिती सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाने येथील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बाजार समिती सभापती अद्वय हिरे हे समितीच्या पाच मासिक सभांना सभापती असून देखील कोणतीही पूर्व सुचना अथवा रजेचा अर्ज न देता बेकायदेशीरपणे गैरहजर राहिल्यासंदर्भात टेहरे येथील धर्मा नारायण शेवाळे यांनी विभागीय सह निबंधकांकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीबाबत सखोल चौकशी करून कार्यवाही करणेबाबत विभागीय सह निबंधकांनी जिल्हा उपनिबंधक (District Deputy Registrar) फैय्याज मुलानी यांना सुचित केले होते. यानुसार शेवाळे यांच्या तक्रारीनुसार चौकशीसाठी मालेगाव उपनिबंधक यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला होता.या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधकांनी अद्वय हिरेंसह तक्रारदार धर्मा शेवाळे, बाजार समिती सचिव यांची सुनावणी घेवून बाजू मांडण्यासाठी संधी दिली होती. ११, १६ व २० डिसेंबर रोजी ही सुनावणी प्रक्रिया घेण्यात आली.
अद्वय हिरे यांच्या वतीने अॅड. अनंतराव जगताप यांनी युक्तीवाद केला. सभापती अथवा सदस्याने संचालक मंडळ सभांना उपस्थित न राहणेबाबत तसेच स्वतः परवानगी घेणेबाबत कृषि उत्पन्न अधिनियमातील तरतूद विचारात घेता अभिप्रेत नाही. जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत पोलिसांनी (Police) १५ नोव्हेंबर २०२३ रोजी अटक केली होती व उच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट २०२४ रोजी जामीनावर मुक्तता केली होती. हिरे कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने संचालक रविंद्र मोरे यांच्या वतीने देण्यात आलेला रजेचा अर्ज मंजुर करण्यात आला होता. त्यामुळे सदस्यत्व रद्द करणे मागणीचा प्रस्ताव नाकारण्यात यावा, अशी मागणी अॅड. जगताप यांनी केली. तर संचालक शेवाळे यांनी युक्तीवाद करतांना अद्वय हिरे सभापती असतांना पुर्व सुचना अथवा रजेचा अर्ज न देता गैरहजर होते. ९ महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ते समितीच्या सक्रिय कामकाजापासून पुर्व परवानगी न घेता गैरहजर होते.
हिरे यांनी स्वतः रजा अर्ज दिलेला नाही व संचालक मंडळाचा ठराव देखील नाही. मोरे यांना रजा अर्ज देण्याचा कायदेशीर अधिकार नाही. आदी विविध मुद्दे मांडत शेवाळे यांनी हिरे यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली. यावेळी बाजार समिती सचिवांतर्फे देखील युक्तीवाद मांडण्यात आला. हिरे, शेवाळे व सचिवांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा उपनिबंधक मुलानी यांनी सभापती अद्वय हिरे बाजार समितीच्या सात सभांना गैरहजर असल्याचे सिद्ध होत आहे. गैरहजर असल्याचा कालावधी ३० दिवसांपेक्षा अधिक असून रजेच्या मंजुरीसंदर्भात राज्य कृषि उत्पन्न खरेदी-विक्री नियममधील तरतुदीनुसार विहित कार्यपध्दतीचे अनुपालन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे, यामुळे सभापती अद्वय हिरे यांचे कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्यत्व राज्य कृषि पणन अधियनियम १९६३ मधील कलम २४ मधील तरतुदीनुसार रद्द करण्याचा आदेश दिला आहे.