नाशिक | Nashik
लोककवी वामनदादा कर्डक (Waman Dada Kardak) यांनी आपल्या शाहिरी, गीतांमधून आणि लेखणीतून बहुजन समाजात आत्मसन्मान व सामाजिक जागृतीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या विचारांचे स्मरण पुढील पिढ्यांपर्यंत राहावे आणि समाजप्रबोधनाची परंपरा अधिक बळकट व्हावी, यासाठी देशवंडी येथे भव्य स्मारक उभारण्यात येत असून हे स्मारक समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) यांनी केले. आज सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार राजाभाऊ वाजे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, समाज कल्याण आयुक्त दिपाली मुधोळ-मुंढे, नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ ओमकार पवार,बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे रविंद्र वामनराव कर्डक, शिवसेना नेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, उदय सांगळे, प्रशांत दिवे, बाळासाहेब कर्डक, प्रवीण कर्डक, सरपंच उज्वला बर्के, संजय सानप, यांच्यासह देशवंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, १५ ऑगस्ट १९२२ रोजी देशवंडी येथे जन्मलेले वामनदादा कर्डक हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनकार होते. शिक्षणाचा गंध नसतानाही त्यांनी बाराखडी व जोडाक्षरे शिकून साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी आपल्या आयुष्यातील गरीबी, अन्याय आणि विषमता अनुभवली आणि त्याच अनुभवातून समाजातील वंचित घटकांच्या वेदना आपल्या शाहिरीतून मांडल्या. वामनदादा कर्डक यांनी दहा हजारांहून अधिक गीते लिहिली असून त्यांच्या गीतांमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्राच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यांच्या शाहिरीने आंबेडकरी चळवळीला सांस्कृतिक बळ दिले आणि समाजातील लाखो लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला असल्याचे त्यांनी सांगितले.




