नाशिक | विशेष प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) पालकमंत्रीपदासाठी (Guardian Minister) जिल्ह्यातील मंत्र्यांमध्ये मोठी चुरस असताना आज मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावे, असा लोकांचा आग्रह आहे, पण मला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको. कारण पुणे, नाशिक हे जिल्हे विकासात नागपूरच्याही खूप पुढे आहेत. विकासात नाशिक एक नंबरला आहे. जिल्हा आर्थिक सक्षम आहे. त्यामुळे मला एक किंवा दोन छोटे-छोटे आदिवासी जिल्हे द्या, अशी मागणी नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी पक्षश्रेष्ठींकडे एका कार्यक्रमात केली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Government) स्थापन झाले. मंत्रिमंडळ विस्तार तसेच आणि खातेवाटपही झाले. मात्र, पालकमंत्रीपदांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पालकमंत्रीपदावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पालकमंत्रीपदाबाबत मोठे भाष्य केले आहे. कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहोत तेही झिरवाळ यांनी आज सांगून टाकले.
मला गोंदिया जिल्ह्याला घेऊन जायचे आहे, असे खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) यांनी सांगितले होते. आता गडचिरोली जिल्ह्यासाठी भरपूर लोकांची मागणी आहे. मात्र मी या दोन-चार जिल्ह्यापैकी एका जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची मागणी केली आहे. पालघर द्या, ठाणे द्या, नंदुरबार द्या, कोणताही जिल्हा द्या, पण आदिवासींचा जिल्हा द्या. मी आदिवासी आहे म्हणून नव्हे, पण मी समाजाचे काहीतरी देणे लागतो. यानिमित्ताने ते देणे परत करण्याची संधी मिळेल, असेही झिरवाळ म्हणाले.
राज्य चालवू शकतो
आदिवासी विकासमंत्री हा आदिवासी समाजाचाच व्हायला हवा, असे राज्यातील जनतेचे मत होतें, पण मी कुठलेही मंत्रीपद सांभाळू शकतो. देवेंद्र फडणवीससह अजित पवार यांनी माझ्याकडे अन्न औषध प्रशासन खाते दिले. ते मी महत्त्वाचे खाते म्हणून पाहतो. या खात्यात मनुष्यबळ कमी आहे. अनेक आव्हाने आहेत. मी २८८ सदस्यांचे सभागृह चालवले. त्यामुळे राज्यही चालवू शकतो, असे नरहरी झिरवाळ यांनी मिश्किलपणे सांगितले.