Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : शिर्डीमार्गे वळवलेल्या नव्या आराखड्याचा पुनर्विचार करा - खासदार वाजेंची...

Nashik News : शिर्डीमार्गे वळवलेल्या नव्या आराखड्याचा पुनर्विचार करा – खासदार वाजेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

नाशिक–पुणे रेल्वे मार्ग थेट असण्यासाठी वाजे आग्रही

नाशिक | Nashik

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (Nashik-Pune Semi High Speed Railway) नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–मंचर–चाकण मार्गे थेट नाशिक–पुणे जोडणी द्यावी, अशी ठाम मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे नाशिक लोकसभेचे खासदार राजभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन वाजे यांनी जनतेच्या भावना प्रत्यक्षरित्या मांडल्या. या भेटीत नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणीची दशकांपासूनची मागणी आता निर्णायक टप्प्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, GMRT संवेदनशील क्षेत्र टाळण्याच्या कारणामुळे मार्ग बदलला जात असला तरी मूलभूत प्रश्न कायम राहील असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

संसदेत उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव (Minister Ashwini Vaishnav) यांनी प्रस्तावित रेल्वे मार्गाला शिर्डी आणि अहिल्यानगरमार्गे वळवण्याचा निर्णय घेतला असून, नारायणगावजवळील Giant Metrewave Radio Telescope (GMRT) च्या संवेदनशील रेडिओ-क्षेत्रामुळे हा बदल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, या वळवलेल्या मार्गामुळे प्रकल्पाचा मूळ हेतू, प्रवासाचा कालावधी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने होणारी प्रचंड हानी याकडे खासदार वाजेंनी लक्ष वेधले. नाशिक–पुणे हा मार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक त्रिकोणाचा कणा आहे. लाखो प्रवासी, कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या दोन शहरांदरम्यान दैनंदिन प्रवास करतात. शिर्डीमार्गे वळवणीमुळे या सर्वांच्या हितावर गदा येणार आहे. त्यामुळे हा मार्ग थेटच असावा अशी मागणीही यावेळी खासदार वाजेंनी केली.

दरम्यान, या रेल्वे मार्गासाठी नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील (Pune District) नागरिक, व्यावसायिक, उद्योगसंस्था, शैक्षणिक संस्था आणि कृषी बाजारपेठांकडून थेट जोडणीचीच मागणी जोरदारपणे होत आहे. याच पार्श्वभूमीवर “नाशिक–पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प हा केवळ प्रवासी सुविधा नसून उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक वृद्धीचा महामार्ग आहे. त्याला वळसा घालणे म्हणजे या भागाचा विकास रोखण्यासारखे आहे, असेही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सांगितले असल्याचे खासदार वाजे म्हणाले.

वैयक्तिक हस्तक्षेप करा, रेल्वेमंत्र्यांकडे विनंती

या प्रकल्पाचे महत्त्व, लोकांच्या भावना आणि महाराष्ट्रातील औद्योगिक पट्ट्याची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन वैयक्तिक हस्तक्षेप करून या प्रकरणाचा तातडीने पुनर्विचार करावा, असेही रेल्वेमंत्र्यांना निवेदन सादर करताना खासदार वाजे यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी मागील दीड वर्षात सातत्याने आग्रही आहे. त्याच फलस्वरूप म्हणून प्रकल्पाबाबत किमान प्रक्रिया तरी सुरू झाली. मात्र, प्रकल्प इतर मार्गाने होत असेल तर त्याचा मूळ उद्देश अर्थात औद्योगिक आणि कृषी क्षेत्राची उन्नती हेच पूर्ण होणार नसेल तर काय उपयोग?

राजाभाऊ वाजे, खासदार नाशिक लोकसभा

ताज्या बातम्या

विराट

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय...

0
मुंबई | Mumbaiभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली...