Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule : 'लाडकी बहीण' योजनेची SIT चौकशी करा - खासदार सुळे

Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ योजनेची SIT चौकशी करा – खासदार सुळे

अंधश्रद्धा आणि भ्रष्टाचारावरूनही सरकारवर हल्लाबोल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची विशेष तपास पथका (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. नाशिक येथे आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर आणि राज्यातील विविध ज्वलंत मुद्द्यांवर कडाडून टीका केली.

- Advertisement -

लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह आणि SIT ची मागणी

लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) त्रुटींवर बोट ठेवत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सुमारे आठ लाख महिलांची नावे केवायसी (KYC) प्रक्रियेतून वगळली गेली आहेत. केंद्र सरकारने जनधन योजना आणि आधार कार्डचा मोठा गाजावाजा केला, मग अद्याप लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण का झाली नाही? या योजनेअंतर्गत झालेल्या सर्व व्यवहारांची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. नेमक्या किती पात्र महिलांना याचा लाभ मिळाला, किती अपात्र लाभार्थी होते आणि लाभार्थ्यांच्या यादीत पुरुष किंवा सरकारी अधिकाऱ्यांची नावे कशी आली, याचे उत्तर सरकारने जनतेला दिले पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.

पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेची वाढती चिंता

राज्यातील अंधश्रद्धेच्या प्रकारांवर चिंता व्यक्त करत त्या म्हणाल्या की, “हा महाराष्ट्र (Maharashtra) यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुरोगामी विचारांचा आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने २१ व्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगातही महिला बुवाबाजीच्या आहारी जात आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे” असे सुळे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nida Khan TCS Case : कायदेशीर चौकटीत बाळाच्या…; निदा खानला जामीन मंजूर करताना न्यायालयाने नोंदवले श्रीकृष्णाच्या जन्माचे निरीक्षण, नेमकं काय म्हटले?

पक्षांतराच्या चर्चांवर मिश्कील टिप्पणी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय पक्षांतराच्या चर्चांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. “आम्हाला आधी काँग्रेसमध्ये, मग शिवसेनेत आणि नंतर भाजपमध्ये पाठवले गेले. आता फक्त मनसेमध्ये पाठवायचे बाकी राहिले आहे. आमच्या पक्षातील कोणीही यावर बोलत नसून, केवळ बाहेरचे लोकच या चर्चा रंगवत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

शेतकरी आणि स्थानिक प्रश्न

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी बैठका सुरू असल्याचे सांगितले. तसेच, इगतपुरीतील भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सरोज अहिरे या लढा देत असून आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्जचा विळखा

राज्यातील बिघडत्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत सुळे म्हणाल्या की, “पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचे प्रमाण आणि व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पोलिसांचा धाक पूर्णपणे कमी झाला असून, लोकप्रतिनिधी थेट डॉक्टर आणि पोलिसांवर हात उचलत आहेत. हे राज्यासमोर आणि देशासमोर उभे असलेले एक मोठे संकट आहे”, असे त्यांनी म्हटले.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडले

सिद्धिविनायक, अयोध्या आणि उज्जैनमधील कथित मंदिरांच्या भ्रष्टाचारावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली. त्या म्हणाल्या की,”भ्रष्टाचार करणारा जेवढा दोषी आहे, तेवढाच तो पाहून गप्प बसणाराही दोषी आहे. पूर्वी ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच नंतर आपल्या पक्षात प्रवेश दिला. जर ते आरोप खोटे होते, तर भाजपने जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही,” असा थेट हल्ला त्यांनी भाजपवर चढवला.

अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना “महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू,” असे जे वक्तव्य केले होते, त्यावर सुप्रिया सुळे यांनी बाजू मांडली. त्या म्हणल्या की, “अमोल दादांनी त्यांच्या विशिष्ट शैलीत ‘विचार करू’ असे म्हटले होते, याचा अर्थ ‘हो’ असा होत नाही.” पत्रकारांनी जुने संदर्भ सोडून ‘सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया’ (निवडक विस्मरण) दाखवू नये, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पवार कुटुंबात सध्या ‘लग्नसराई’

राजकीय टीकेनंतर कौटुंबिक विषयावर बोलताना त्यांनी वातावरण हलकेफुलके केले. यावेळी सुळे म्हणाल्या की, “आमच्या पवार कुटुंबात सध्या लग्नसराई सुरू आहे. युगेंद्र, जय, रेवतीनंतर आता पार्थ पवारचे लग्न ठरले आहे आणि लवकरच अजून एक गोड बातमी तुम्हाला कळेल,” असे सुप्रिया सुळे यांनी हसतमुख सुरात सांगितले. या पत्रकार परिषदेला खासदार भास्कर भगरे, गोकुळ पिंगळे, कोंडाजी मामा आव्हाड, छबू नागरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...