नाशिक | Nashik
ज्येष्ठ अभिनेते विश्वनाथ उर्फ नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे आज (दि.०८ ऑक्टोबर) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यातील (Goa) दोन पावलामधील घरी त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पहाटे ५.२० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. नाना पाटेकरांचे नाशिकशी चित्रपट क्षेत्रासोबत सांस्कृतिक आणि कौटुंबिक नाते देखील होते.
हे देखील वाचा : मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाशिकची कन्या नीलकांती यांच्याशी विवाह
नाना पाटेकर यांची पत्नी नीलकांती हलदुले-पाटेकर (Nilkanti Huldule-Patekar) या नाशिकच्या रहिवासी असून, त्यांची सासुरवाडी गणेशवाडी परिसरातील आहे. नाना व नीलकांती यांची ओळख आधी मैत्रीत झाली आणि मैत्रीचे रूप नंतर प्रेमात झाले. त्यानंतर प्रेमाचे रूपांतर विवाहात (Married) झाले आणि दोघे १९७८ मध्ये विवाहबद्ध झाले.नीलकांती यांनी अवघ्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश करत पुढे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्री म्हणून काम करण्यासोबतच त्यांनी लेखिकेची भूमिकाही समर्थपणे निभावली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले. दीर्घ काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटातून त्यांनी पुन्हा पडद्यावर पुनरागमन केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
अडीच वर्षांच्या मुलाच्या निधनाचा मोठा धक्का
विवाहानंतर त्यांच्या संसारात दुर्वासा पाटेकर आणि मल्हार पाटेकर या दोन मुलांचे आगमन झाले. मात्र,या संसाराला नियतीने मोठी वेदना दिली. मोठा मुलगा दुर्वासा याला जन्मापासूनच आरोग्याशी संबंधित समस्या असल्याने अवघ्या अडीच वर्षांच्या वयात त्याचे निधन झाले. या घटनेचा नाना आणि नीलकांती यांच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला.मुलाला गमावण्याचे दुःख दोघांनीही आयुष्यभर आपल्या मनात जपले.त्यानंतर धाकटा मुलगा मल्हार पाटेकर याने पुढे चित्रपटसृष्टीत वाटचाल केली. राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक ऑफ २६/११’ या चित्रपटासाठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. तो ‘नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस’शीही जोडला गेला. मात्र, वडीलांप्रमाणेच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा मल्हारने आपले वैयक्तिक आयुष्य बऱ्यापैकी खासगी ठेवले.
हे देखील वाचा : Nana Patekar Death : लहानवयात आर्थिक अडचणींचा सामना अन् ‘गमन’ ते ‘नटसम्राट’ अभिनयाचा बुलंद आवाज; असा होता नाना पाटेकरांचा संघर्षमय प्रवास
३५ वर्षे वेगळे राहिले, तरी आदर कायम
नाना आणि नीलकांती यांच्या वैवाहिक नात्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी कधीही कायदेशीर घटस्फोट घेतला नाही. मात्र, जवळपास ३५ वर्षांपासून ते वेगवेगळे राहत होते.परस्पर संमतीने स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी या नात्याबाबत स्पष्टपणे भाष्य केले होते. त्यांच्या मते, दोघांच्या स्वभावात तसेच विचार करण्याच्या पद्धतीत मोठा फरक होता. त्यामुळे एकत्र राहणे दोघांसाठीही कठीण होत गेले आणि स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, वेगळे राहत असतानाही नीलकांती यांच्याबद्दलच आदर त्यांच्या मनात कायम राहिला.
हे देखील वाचा : Nana Patekar Death : ‘प्रतिघात’चे शूटिंग, ‘नटसम्राट’ची आठवण अन्…; नाशिकशी जोडला होता नाना पाटेकरांचा अनोखा ऋणानुबंध
वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले
पडद्यावर असंख्य व्यक्तिरेखा जगणार्या नाना पाटेकर यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सुख-दुःखाचे अनेक चढ-उतार आले. नीलकांती यांच्यासोबतचे नाते, मुलगा दुर्वासाचे अकाली निधन आणि मल्हारची चित्रपटसृष्टीतील वाटचाल या त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आठवणी ठरल्या. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या कलावंताच्या प्रवासामागे एक संवेदनशील पती, दुःखाने होरपळलेला पिता आणि कुटुंबाशी नात्यांचा आदर जपणारा माणूसही बघायला मिळाला.
हे देखील वाचा : Nana Patekar Death : नाना पाटेकरांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; पुण्यातील डोणजे गावात पार्थिव आणणार


