मुंबई | Mumbai
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, पहाटे ५.२० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील जन्म
नाना पाटेकर यांचा जन्म ०१ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर आणि आईचे नाव संजनाबाई पाटेकर होते. तर अशोक पाटेकर आणि दिलीप पाटेकर हे त्यांचे भाऊ आहेत. तर नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती आणि मुलाचे नाव सम्राट आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बालपण गेले गरिबीत
नाना पाटेकर यांचे बालपण प्रचंड गरिबी आणि संघर्षात गेले. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना लहान वयातच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अवघ्या १३-१४ वर्षांच्या वयातच नानांना काम करावे लागले. ते चित्रपटांचे (Movie) पोस्टर्स पेंट करणे, पोस्टर्स घरोघरी आणि रस्त्यांवर लावणे यांसारखी कामे करून स्वतःचा खर्च आणि शिक्षणाचा भार उचलत असत.
कला क्षेत्रात केले होते शिक्षण पूर्ण
नानांना रेखाचित्रे (स्कॅचिंग) काढण्याचा शौक होता. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधून कला क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांचा कल नाटकांकडे झुकला आणि त्यांनी कॉलेजच्या नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली, जिथून त्यांच्या अभिनय प्रवासाची पायाभरणी झाली.
गमन चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात
नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये गमन या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुझफ्फर अली यांनी केले होते आणि यात फारुख शेख, स्मिता पाटील यांच्या मुख्य भूमिका होत्या. यानंतर त्यांना खरी ओळख त्यांच्या १९८६ मध्ये आलेल्या अंकुश चित्रपटाच्या भूमिकेनंतर मिळाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये काम केले आहे. परिंदा’ तिरंगा, क्रांतीवीर आणि खामोशी यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपली अभिनयाची चुणूक दाखवून दिली.
‘नटसम्राट’साठी मिळाला होता सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
सिनेसृष्टी आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१३ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर २०१६ मध्ये ‘नटसम्राट’ या मराठी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दरम्यान नाना पाटेकर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसले होते. तसेच, शाहिद कपूरच्या ‘ओ रोमियो’ सिनेमात त्यांनी ‘इस्माईल खान’ ही भूमिका साकारली होती. नाना पाटेकर यांनी गायनातही आपला हात आजमावला असून, ‘यशवंत’, ‘वजूद’ आणि ‘आंच’ सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते.




