Friday, October 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNana Patekar Death : 'प्रतिघात'चे शूटिंग, 'नटसम्राट'ची आठवण अन्...; नाशिकशी जोडला होता...

Nana Patekar Death : ‘प्रतिघात’चे शूटिंग, ‘नटसम्राट’ची आठवण अन्…; नाशिकशी जोडला होता नाना पाटेकरांचा अनोखा ऋणानुबंध

नाशिक | Nashik

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे आज (दि.०८ ऑक्टोबर) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल कला क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. नाना पाटेकर यांच्या जसं इतर शहरांशी नाते होते तसंच नाशिकसोबत देखील होते. नाशिकची ओळख केवळ तीर्थक्षेत्र, द्राक्ष नगरी किंवा कुंभनगरी अशीच नाही तर साहित्य, नाट्य, चित्रपट आणि सामाजिक चळवळींचीही या शहराला समृद्ध परंपरा लाभली आहे. या सांस्कृतिक परंपरेशी अनेक कलावंतांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. यामध्ये दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जायचे.

- Advertisement -

‘प्रतिघात’ चित्रपटाच्या शूटिंगने जुळले नाते

अभिनयातील ताकदीबरोबरच सामाजिक बांधिलकीसाठी ओळखले जाणाऱ्या नाना पाटेकर यांच्या आयुष्यात नाशिकने (Nashik) वेगवेगळ्या टप्प्यांवर आपली छाप सोडली होती.नाना यांचा नाशिकशी संबंध सर्वप्रथम चित्रपटाच्या माध्यमातून आला. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील ‘प्रतिघात’ या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिकमध्ये झाले होते. त्यामुळे नाशिकच्या चित्रपटप्रेमींना नाना पाटेकर यांना जवळून पाहण्याची आणि त्यांच्या अभिनय प्रक्रियेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली होती.

हे देखील वाचा : मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘नटसम्राट’ आणि कुसुमाग्रज भूमीशी जोडलेला सांस्कृतिक दुवा

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ या अजरामर नाट्य कृतीवर आधारित चित्रपटात नाना पाटेकर यांनी साकारलेली गणपतराव बेलवलकरांची भूमिका मराठी रसिकांच्या मनात कायमची घर करून राहिली. या चित्रपटाच्या निमित्ताने नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाशिकमधील कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली होती. कुसुमाग्रजांच्या भूमीत त्यांच्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपटाची चर्चा होणे, हा नाशिकच्या सांस्कृतिक विश्वासाठीही महत्त्वाचा क्षण होता. कुसुमाग्रजांच्या साहित्याने नाशिकला देशाच्या साहित्य नकाशावर वेगळी ओळख मिळवून दिली. त्यामुळे ‘नटसम्राट’च्या निमित्ताने नाना पाटेकर यांचे नाशिकशी जोडले गेलेले नाते हे केवळ कलावंत आणि शहर यांच्यातील नाते न राहता मराठी रंगभूमी,साहित्य आणि चित्रपट यांना जोडणारा सांस्कृतिक दुवा ठरले.

मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते

अभिनेते नाना पाटेकर यांनी १९९७ मध्ये नाशिक येथे झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यावेळी येथील उदयोन्मुख चित्रकर्ती सुहास जोशी (पुर्वाश्रमीच्या रोहिणी बापट) यांनी नानांचे रांगोळी द्वारे पोर्ट्रेट साकारले होते. त्यावेळी जे.जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये शिकलेल्या नानांनी कौतुक करून शाबासकीची थाप दिली होती.

हे देखील वाचा : Nana Patekar Death : “अस्वस्थ वाटल्याने मित्राला मेसेज केला, रुग्णालयात नेत असतानाच..”; नाना पाटेकरांसोबत मध्यरात्री काय घडलं? डॉक्टरांनी सगळंच सांगितलं

‘नाम फाउंडेशन’ आणि शेतकरी साहित्य संमेलन

नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शेतकरी आणि ग्रामीण समाजाशी असलेली त्यांची बांधिलकी होय. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी काम सुरू केले. या सामाजिक कार्याच्या निमित्तानेही त्यांचे नाशिकशी सातत्याने संबंध आले.मार्च २०२४ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले होते हा या नात्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. शेतकरी, साहित्य आणि सामाजिक वास्तव या तिन्ही विषयांना एका व्यासपीठावर आणणाऱ्या या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर भाष्य केले होते.

नाशिककरांनी विविध पैलूंनी अनुभवले ‘नाना’

पडद्यावर विविध भूमिका साकारणारा अभिनेता जेव्हा प्रत्यक्ष समाजातील प्रश्नांवर बोलतो, तेव्हा त्याच्या शब्दांना वेगळे वजन प्राप्त होते असे त्यावेळी दिसून आले होते. त्यामुळे नाशिकच्या सांस्कृतिक वातावरणात नाना पाटेकर यांच्याविषयीचे आकर्षण वेगळेच होते. एकीकडे ‘प्रतिघात’मधील अभिनेता, दुसरीकडे ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर, तर तिसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरणारा सामाजिक कार्यकर्ता नाना पाटेकर यांच्या या विविध पैलूंना नाशिकने वेगवेगळ्या प्रसंगी जवळून अनुभवला होता.

हे देखील वाचा : Nana Patekar Death : लहानवयात आर्थिक अडचणींचा सामना अन् ‘गमन’ ते ‘नटसम्राट’ अभिनयाचा बुलंद आवाज; असा होता नाना पाटेकरांचा संघर्षमय प्रवास

आठवणींच्या पडद्यावर कायम राहणारा ऋणानुबंध

नाना पाटेकर हे मुळचे नाशिकचे नव्हते तरीही त्यांच्या कलात्मक आणि सामाजिक प्रवासातील काही महत्त्वाचे क्षण नाशिकशी जोडले गेले होते. त्यामुळे नाना पाटेकर आणि नाशिकचा संबंध हा जन्मभूमीचा नसला तरी कला, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक बांधिलकीचा होता. नाशिकच्या सांस्कृतिक स्मृतींमध्ये एखाद्या कलाकाराची उपस्थिती ही त्याने येथे किती वेळा भेट दिली यावर ठरत नाही; तर त्याने या शहराच्या सांस्कृतिक मनाशी किती संवाद साधला, यावर ठरते. त्या अर्थाने नाना पाटेकर आणि नाशिक यांचा ऋणानुबंध हा आठवणींच्या पडद्यावर कायम राहिला आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना

शिवसेना पक्ष-धनुष्यबाणाचा फैसला ‘या’ तारखेला; सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष!

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद सुरु...