Friday, September 25, 2026
Homeनाशिक​Nashik News : श्रावणी सोमवारपूर्वी नाशिककरांची अग्निपरीक्षा; खोदाकामामुळे शहराला कोंडीचा वेढा

​Nashik News : श्रावणी सोमवारपूर्वी नाशिककरांची अग्निपरीक्षा; खोदाकामामुळे शहराला कोंडीचा वेढा

एसीपी रेड्डी, मनपा आणि एसटी प्रशासनाकडून संयुक्त पाहणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सुरू असलेली विकासकामे, भूमिगत पाईपलाईन, ऑप्टिकल फायबर केबल आणि गॅस वाहिनीच्या खोदकामामुळे संपूर्ण नाशिक चिखलमय झाले आहे. अशातच येत्या १३ ऑगस्टपासून श्रावण मासारंभ होत असल्याने, खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे नाशिककरांसह भाविकांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखा, नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) आणि एसटी महामंडळाने संयुक्तपणे परिस्थितीची पाहणी करत उपाययोजनांची आखणी सुरू केली आहे.

- Advertisement -

​श्रावण महिन्यात (Month of Shravan) शहरातील शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची अलोट गर्दी होते. मात्र, पंचवटीतील कपालेश्वर मंदिर, रामवाडी येथील सिद्धेश्वर आणि गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर खोदकाम झाले आहे. सद्यस्थितीत कपालेश्वर मंदिर परिसरातून पायी चालणेही मुश्कील आहे. त्यातच दर श्रावणी सोमवारी येथे प्रचंड गर्दी लोटणार असल्याने भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी पथकांसह पंचवटी, सरदार चौक, मालवीय चौक आणि गोदाघाट परिसराची पाहणी केली असून, येथे अतिरिक्त वाहतूक पोलीस आणि वॉर्डन तैनात केले जाणार आहेत. दुसरीकडे ​सातपूर ते त्र्यंबक रोडवर सिंहस्थाची कामे सुरू असल्याने येथे नेहमी वाहतूक ठप्प होत आहे. त्र्यंबककडे (Trimbak) जाणारी अवजड वाहने गिरणारे, पिंपळगाव खांब आणि मातोरीमार्गे वळवून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असला, तरी प्रवाशांचा प्रवास खडतरच राहण्याची शक्यता आहे.

​बसस्टँड परिसराला कोंडीचा विळखा

​श्रावणी सोमावारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बसेस साेडल्या जातात. यासाठी मेळा बसस्टँड हे प्रमुख केंद्र असते. परंतु, ठक्कर बाजार ते तालुका पोलीस ठाण्याला जोडणारा मुख्य रस्ता अजूनही बंद असल्याने मेळा बसस्टँड, सीबीएस आणि ठक्कर बाजार परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणार आहेत. मेळा बसस्टँड कोंडीच्या विळख्यात सापडणार आहे.

संयुक्त बैठकांचा धडाका

​वाहतुकीची ही कोंडी फोडण्यासाठी आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी होणारी अफाट गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस, मनपा आणि एसटी महामंडळाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. एसीपी माधव रेड्डी, मनपा अधिकारी आणि एसटी प्रशासनाची यापूर्वीच एक संयुक्त बैठक पार पडली असून, लवकरच दुसरी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यात मेळा बसस्थानक आणि सीबीएस परिसराची संयुक्त पाहणी करून पर्यायी मार्गांवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

मुद्दे

  • कपालेश्वर, सोमेश्वर व सिद्धेश्वर मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दूरवस्था.
  • पाईपलाईन, केबल्स आणि रस्ते कामांमुळे शहर चिखलमय.
  • त्र्यंबकराेडवरची अवजड वाहतूक गिरणारे, मातोरी व पिंपळगाव खांबमार्गे .
  • ठक्कर बाजार-तालुका पोलीस ठाणे रस्ता बंद असल्याने सीबीएसवर ताण.
  • एसीपी माधव रेड्डी व अधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची चाचपणी.
  • त्र्यंबकेश्वर भाविकांसाठी मेळा बसस्थानकावरून विशेष नियोजन.

ताज्या बातम्या

टाकळीभान येथे पाटचारीच्या पाण्यात पडल्याने तरूणाचा मृत्यू

0
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ऋषिकेश नामदेव कांबळे ( वय 30) या तरूणाचा पाटचारी नं.16 च्या वाहत्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे....