नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhstha Kumbhmela) आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणारा देशाच्या राष्ट्रपतींचा नाशिक दौरा या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालय सतर्क झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कोणत्याही घातपाती किंवा बेकायदेशीर हालचालींना थारा मिळू नये, यासाठी गेल्या आठवड्यापासून पोलिसांची गोपनीय पथके आणि सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी कामाला लागले आहेत. सुरक्षेमध्ये कोणतीही कसर राहू नये म्हणून पोलिसांनी टप्प्याटप्प्याने कारवायांची धार तीव्र केली आहे.
काही दिवसांपूर्वी म्हसरूळ आणि सातपूर पोलीस ठाण्याच्या (Mhasrul and Satpur Police Station) हद्दीत ही मोहीम राबवण्यात आली. नियमानुसार आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची आणि घरमालकांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असते. मात्र, ही माहिती वेळेत सादर न करणाऱ्या घरमालक आणि भाडेकरूंच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. परप्रांतीय किंवा संशयित व्यक्ती शहरात आश्रय घेत असल्यास त्यांचा माग काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. यानंतर, मोहिमेचा विस्तार करत पोलिसांनी मुंबई नाका आणि द्वारका या वर्दळीच्या व संवेदशनशील परिसरांवर लक्ष केंद्रित केले.
या भागातील पाच हॉटेल आणि लॉज मालकांनी त्यांच्याकडे उतरणारे परदेशी नागरिक आणि इतर पर्यटकांची माहिती (सी फॉर्म किंवा लॉग बुक) वेळेत संकलित केली नव्हती. पोलिसांनी (Police) आधी नोटीस बजावूनही नियमांचे पालन न केल्याने अखेर या हॉटेल मालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. यानंतरच्या तिसऱ्या टप्प्यात शहरातील पाच वाहन बाजार मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अनेकदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा घातपाती कारवाया करणारे घटक किंवा विना-नोंदणी जुनी वाहने सहज उपलब्ध होतात का याचा शोध घेतात. जुनी वाहने खरेदी करताना ग्राहकाची अचूक ओळख, कागदपत्रे आणि अधिकृत नोंदणी न केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. हाच धागा पकडून पोलिसांनी वाहन बाजारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये पाच वाहन बाजार मालकांवर मुंबईनाका पाेलिसांनी (Mumbai Naka Police) गुन्हे नाेंद केले आहेत.
ही पथके आहेत कार्यरत
ही धडक मोहीम पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश दिले असून पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच), विशेष शाखा, गोपनीय शाखा (इंटेलिजन्स) आणि शहरातील सर्व संबंधित पोलीस ठाण्यांची विशेष पथके मिळून ही कारवाई संयुक्तरीत्या करत आहेत.
घातपाती कारवायांना आळा
पुढील टप्प्यात अशाच प्रकारे दुर्लक्षित इतर आस्थापना, दुकाने, आणि घातपाती कारवायांसाठी पोषक ठरू शकणाऱ्या संशयितांसह जागांचा शोध घेतला जात आहे. सुरक्षेला अप्रत्यक्षपणे छेद देऊ शकणाऱ्या प्रत्येक घटकावर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. पोलिसांनी शहरवासीयांसह घरमालक, हॉटेल व्यावसायिक, आणि वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या सर्व घटकांना सुरक्षेच्या नियमांचे कटाक्षाने पालन करुन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.




