Friday, May 15, 2026
HomeनाशिकNEET Paper Leak Nashik Connection : स्पर्धा परीक्षा पेपरफुटीची 'तीस वर्षांची परंपरा';...

NEET Paper Leak Nashik Connection : स्पर्धा परीक्षा पेपरफुटीची ‘तीस वर्षांची परंपरा’; नाशिक राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चेत

नाशिक | Nashik

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे (NEET Paper Leak Case) धागेदोरे आता थेट नाशिकपर्यंत (Nashik) पोहोचल्याने शहर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. या प्रकरणात नाशिकमधील ३० वर्षीय शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली असून, स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीची नाशिकमधील जुनी साखळी पुन्हा चर्चेत आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम खैरनार हा नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) रहिवासी असून नाशिकमध्ये बी.ए.एम.एस.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. तपास यंत्रणांना आधी त्याचे नाव समजले होते, मात्र ठोस पत्ता मिळत नव्हता. तांत्रिक तपास आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी शुभमने टक्कल करून वेषांतर केल्याची माहिती समोर आली आहे. कपडे बदलून तो देवदर्शनासाठी निघाला असताना मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला बदललेल्या ‘लूक’मुळे तो ओळखू आला नाही, मात्र पोलिसांच्या (Police) सतर्कतेमुळे अवघ्या एका तासात त्याला पकडण्यात यश आले. तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार ३ मे रोजी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेची (NEET Exam) प्रश्नपत्रिका १ मे रोजीच फुटली होती. शुभम खैरनारने ही प्रश्नपत्रिका तब्बल १० लाख रुपयांना विकत घेतल्याचा आणि पुढे १५ लाख रुपयांना विकल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या व्यवहारानंतर प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून व्हायरल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नाशिकमधील स्पर्धा परीक्षा पेपरफुटीच्या जुन्या घटनाही पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सुमारे तीस वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात एका अकादमीने हमखास यशाचे आमिष दाखवत अनेक विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढले होते. त्या प्रकरणातही मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी संबंधित अकादमीत कार्यरत असलेले काही चेहरे आजही आहे. भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) तेव्हा त्याच अकादमीत होता.’नीट’ पेपरफुटीच्या या नव्या प्रकरणामुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नाशिकचे नाव पुन्हा एकदा देशभरात गाजू लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या