नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या वतीने गत चार महिन्यांपासून घरपट्टी थकबाकीदारांसाठी सुरू असलेली अभय योजना ३१ जानेवारीला संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात थकबाकीची रक्कम मनपाला घेणे बाकी आहे. त्यामुळे आता मार्चअखेरपूर्वी थकबाकीदारांविरुद्ध कडक वसुली मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा थेट नोटिसा बजावून जप्तीची कारवाई करणार असल्याचे समजते.
नाशिक महापालिकेची मालमत्ता कर थकबाकी दिवसेंदिवस वाढत जात आहे त्याचा आकडा सुमारे ६०० कोटींपर्यंत गेल्याने मनपा करसंकलन विभाग वसुलीसाठी ॲक्शन मोडवर आला असून त्यासाठी विभागनिहाय टॉप शंभर थकबाकीदारांची यादी तयार केली असून त्यांना वॉरंट बजावण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात मालमत्ता कर महत्त्वाचा स्त्रोत असला तरी गत काही वर्षांपासून मालमत्ता कर थकबाकीचा डोंगरच तयार झाला आहे. आयुक्तांनीदेखील वसुलीबाबत आढावा घेत थकबाकीदारांना वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.
आयुक्तांनी मोकळा हात दिल्याने करसंकलन विभाग ॲक्शन मोडवर आला असून सहाही विभागांतील टॉप थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. थकबाकीचा आकडा शास्तीसह सहाशे कोटींच्या घरात पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी २५५ कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र २१० कोटी वसुली झाली. त्यातही अभय योजनेमुळे वसुलीने २०० कोटींचा टप्पा ओलांडला. आता मार्चअखरेपर्यंत ४५ कोटी वसूल करण्याचे आव्हान करसंकलन विभागासमोर असल्याने वॉरंट अस्त्र बाहेर काढले असून थकबाकीदारांच्या घरी ते धाडले जात आहे.
अन्यथा लिलाव
मिळालेल्या माहितीनुसार, १२ दिवसांची नोटीस बजावण्यात आल्यानंतरही थकबाकीदाराने पैसे भरले नाही तर थेट त्यांच्या घर तसेच इतर मालमत्तांवर बोजा चढवत लिलाव प्रक्रियादेखील मनपा करणार आहे.