नाशिक | Nashik
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नागरिकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ओझर (नाशिक) विमानतळावरून (Air Port) नवी दिल्लीसाठी सकाळची विमानसेवा आज (दि. १ ऑक्टोबर २०२६) पासून पुन्हा सुरू झाली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना निवेदन देऊन तातडीने विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार भगरे यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या प्रश्नात विशेष सहकार्य केले.
खासदार भगरे यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना दिलेल्या निवेदनात नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. नाशिकच्या ओझर विमानतळावरून (Ozar Airport) दिल्लीसाठी पूर्वी नियमित सकाळची विमानसेवा उपलब्ध होती. दिल्लीहून नाशिकसाठी सकाळी ६.२० वाजता, तर नाशिकहून दिल्लीसाठी सकाळी ८.४० वाजता विमानसेवा उपलब्ध असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी तसेच शासकीय कामासाठी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळत होती.
मात्र, ही विमानसेवा २८ मार्च २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. नाशिक जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे खासदार भगरे यांनी आपल्या निवेदनातून केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नाशिक-दिल्ली (Nashik to Delhi) विमानसेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
आजपासून सुधारित वेळापत्रक
विमानतळ प्रशासनाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, इंडिगोचे 6E2312 हे विमान दररोज सकाळी ९.०० वाजता ओझर (नाशिक) येथून नवी दिल्लीसाठी रवाना होऊन सकाळी १०.५० वाजता दिल्ली येथे पोहोचणार आहे. तसेच 6E6311 हे विमान दिल्लीहून सकाळी ६.४० वाजता रवाना होऊन सकाळी ८.३० वाजता नाशिक विमानतळावर पोहोचणार आहे. हे सुधारित वेळापत्रक १ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी लागू करण्यात आले आहे. सकाळची थेट नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे नाशिक जिल्ह्याची राजधानी दिल्लीशी हवाई कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः द्राक्ष, कांदा व इतर कृषी उत्पादनांच्या व्यापारासह उद्योग, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि शासकीय कामकाजासाठी दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली मागणी आणि त्यानंतरचा सातत्यपूर्ण पाठपुरावा याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे आभार.
भास्कर भगरे. खासदार दिंडोरी लोकसभा




