Saturday, July 4, 2026
Homeनाशिकपडसाद : नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा

पडसाद : नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा

नाशिक | शैलेंद्र तनपुरे | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक शहरात विकासकामांची एकच धूम उठली असली तरी एकाचवेळी ही कामे होत असल्याने त्याच्या त्रासाने नाशिककर अक्षरशः विटले आहेत. असे असले तरी त्याव्यतिरिक्तही काही चांगली कामे प्रस्तावित होत असल्याने येत्या एक-दोन वर्षांत नाशिकचा चेहरामोहरा बदलला जाईल असे सध्यातरी वाटत आहे. नाशिक ट्रैफिक पार्कचा विषय अजूनही अहंकाराच्या वावटळीतून बाहेर पडलेला नसल्याने त्याबाबत चर्चा, बैठका होऊनही तोडगा काही निघालेला दिसत नाही. अशा काही समाजजीवनावर चांगली छाप पाडणाऱ्या योजनांबाबत अनिश्चितता जरूर आहे, पण काही चांगल्या योजनाही महापालिकेकडून प्रस्तावित होत आहेत, याचे समाधान निश्चित आहे. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन स्रणालयातील मुख्य प्रयोगशाळा नाशिकरोड येथील बहुचर्चित अशा बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेचा आहे. पूर्वाश्रमीचे बिटको रुग्णालय म्हणून प्रसिद्ध असलेले हे रुग्णालय पालिकेच सर्वाधिक मोठे, आधुनिक रुग्णालय आहे. येथे सर्वप्रकारच्या आधुनिक सुविधा आहेत.

- Advertisement -

दररोज शेकडो रुग्णांवर तेथे उपचार केले जातात. कथडा रुग्णालयातील अवघ्या साडेसातशे चौरस फूट जागेत सध्या ही मुख्य प्रयोगशाळा कार्यरत आहे. याशिवाय पंचवटी, मोरवाडी, तसेच नाशिकरोड येथील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्तसंकलन केंद्रे आहेत. बिटको रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने गर्भवती महिला प्रसूतीपूर्व तपासणीसाठी येत असतात. मात्र, त्यांच्या रक्त व इतर चाचण्यांसाठी नमुने कथडा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचे अहवाल यायला विलंब लागतो. अनेकदा गोरगरीब रुग्णांना वारंवार चकरा माराव्या लागतात. ही अडचण दूर करण्यासाठी बिटको रुग्णालयात प्रयोगशाळा स्थलांतरित करून त्यालाच डायग्नोस्टिक हब करण्याचा विचार पालिकेचा आहे. अत्यंत योग्य व रास्त असा हा विचार असला तरी त्यासोबतच सध्या बिटको रुग्णालयाच्या आजारपणाचे निदान कोण करणार व त्यावर इलाज कसा करणार हा गहन प्रश्न असून सर्वप्रथम तो सोडविणे गरजेचे आहे.

या रुग्णालयातील भोंगळ कारभारावर आजपर्यंत माध्यमांमधून रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध झाला आहे. पालिकेतर्फे तात्पुरती मलमपट्टी केली जाते, पण पुढे काहीच होत नाही. येथे सिक्युरिटी प्रेसच्या आर्थिक मदतीने तयार झालेल्या ब्लड बँकेच्या उ‌द्घाटनालाही अद्याप पालिकेच्या पुढाऱ्यांना वेळ मिळालेला नाही. किमान तीन वेळा हे उद्घाटन पुढे ढकलावे लागले आहे. कर्मचाऱ्यांची वानवा तर आहेच, शिवाय बेशिस्ती शिगोशिग भरून राहिलेली आहे. गेल्याच आठवड्यात काही कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांची डीजे लावून भव्य मिरवणूक काढली गेली. अशी मिरवणूक काढायला कोणाची ना नाही, पण रुग्णालयातील रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेऊन या कम ‘चाऱ्यांनी वा त्यांच्या हितचिंतकांनी आपल्या उत्साहाला जरा आवर घातला असता तर काही बिघडले नसते. परंतु एवढा शहाणपणा ना त्यांच्यात होता ना त्यांना अडवण्याचे धाडस अधिकाऱ्यांमध्ये. या असल्याच बोटचेप्या प्रवृत्तीमुळे समाजविघातक शक्तींचे तेथे फावले आहे. कोणीही यावे आणि चक्क शस्रास्त्र घेऊन हाणामारी करून जावे एवढी बेबंदशाही तेथे माजलेली आहे.

दीडशे कोटी रुपये खर्चुन बांधलेल्या या बहुमजली रुग्णालयात अवघे दीडशे कर्मचारी आहेत. व्हेंटिलेटर सुविधा आहे, पण ती अतिदक्षता विभागात नाही, शस्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स न्यायव्यवस्थेप्रमाणे तारखावर तारखा देतात, रुग्णांचे बेडशीट्स, चादरी स्वच्छ करावयाच्या असतात याची माहितीच तेथील कर्मचाऱ्यांना नाही. शौचालयाची दुर्दशा तर पहावत नाही. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, अशी स्थिती या रुग्णालयाची आहे, कारण येथे कान, नाक, डोळा या अवयवांच्या शस्त्रक्रियाचा होत नाहीत. रात्री दिवे बंद केले जातात, त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होतात. जळीत रुग्णांची तर काहीच व्यवस्था नाही. म्हणायला सर्वात मोठे रुग्णालय, पण सर्वाधिक दुर्लक्षही होते. म्हणूनच डायप्रोस्टिक हब करण्याचा विचार चांगलाच आहे, त्याचे स्वागतच, पण सध्या या रुग्णलायाची जी काही हालत आहे, त्या स्थितीत ही प्रयोगशाळा कितपत कार्यक्षमतेने चालू राहील याबाबत साधार शंका आहे.

सिंहस्थात आरोग्याच्या विषयाचाही विचार केला गेला आहे. येणारे कोट्यवधी रुग्ण हे अडचणीच्या वेळी खासगी रुग्णालयांमध्ये न जाता सरकारी रुग्णालयाचाच आधार घेतील. त्यामुळे रस्ते, रिंगरोड, पूल आदी कामांमधून फुरसत मिळाली तर बिटकोसारख्या रुग्णालयांच्या दुर्दशेकडेही प्रशासनाने पहायला हवे. या रुग्णालयाची अवस्था मांडून सगळेच आता थकले आहेत. किमान सिंहस्थाचे कारण काढून तरी रुग्णालयाची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मुळात प्रशासकीय अनास्था या सगळ्या बेबंदशाहीस जबाबदार आहे. त्याचे काय करणार हा खरा प्रश्न आहे. पैसाही खर्च न करता उभारलेल्या ब्लड बँकेच्या उ‌द्घाटनासाठी जेथे पुढारी व प्रशासनाला अद्याप वेळ मिळू शकत नाही, तेथे या रुग्णालयातर्फे अद्ययावत आरोग्य सुविधा गोरगरीब रुग्णांना मिळू शकतील हे सध्यातरी स्वप्नवतच आहे. त्याचमुळे मुख्य प्रयोगशाळा स्थलांतरित करण्याचा विचार चांगला असला तरी ती प्रयोगशाळा उत्तम रित्या चालू राहील, अशी परिस्थिती प्रथम निर्माण करावी लागेल. तसे झाले तरच या स्थलांतराला काही अर्थ राहील.

ताज्या बातम्या

Union Cabinet Expansion : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता;...

0
नवी दिल्ली | New Delhi उत्तरप्रदेश, पंजाबसह आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet Expansion) मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप...