Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : ५० टक्के पुरवठ्यामुळे रेशन दुकानदार त्रस्त

Nashik News : ५० टक्के पुरवठ्यामुळे रेशन दुकानदार त्रस्त

धुळे, नंदुरबारला नाशिकहून पुरवठा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

धुळे आणि नंदुरबार (Dhule and Nandurbar) या दोन जिल्ह्यांना (District) मनमाडच्या (Manmad) एफसीआय गोदामातून धान्य दिले जात आहे. नाशिकला (Nashik) दररोज येणाऱ्या ६५ ट्रक धान्यपुरवठा आवश्यक आहे. परंतु सद्यस्थितीत ३० ट्रकद्वारेच धान्याचा पुरवठा केला जात आहे. उर्वरित धान्याची उचल धुळे आणि नंदुरबारसाठी केली जात असल्यामुळे नाशिककरांना ५० टक्के पुरवठा केला जात आहे. दहा दिवसांच्या वेळेत धान्य पूर्णपणे उचलणे शक्य होत नाही. परिणामी ग्राहक, कार्डधारक यात नाहक भरडला जात आहे. तर रेशन दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

दोंडाईचा येथील एफसीआयच्या गोदामातून (FCI warehouse) धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना धान्याचा पुरवठा केला जातो. रेल्वेच्या रेकने धान्य इथे आणले जाते आणि तेथून ट्रकद्वारे या धान्याच्या पुरवठा दोन्ही जिल्ह्यांमध्ये नियमितपणे केला जातो.प्रत्यक्षात एफसीआयचे गोदाम असलेला भाग हा शहराच्या मध्यवस्तीच्या पलीकडे आहे. गोदामाकडे जाण्यासाठी नागरी वस्तीतून अत्यंत अरुंद असा रस्ता आहे. त्यामुळे या भागातून अवजड वाहने नेण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. दुसऱ्या बाजूने गोदामातील हमालांकडूनही विविध प्रलंबित मागण्या पूर्तीसाठी असहकार आंदोलन केले जात आहे. याचा परिणाम या गोदामातून धुळे आणि नंदुरबारला जाणाऱ्या धान्याची उचल मागील सहा महिन्यांपासून बंदच आहे.

पर्यायाने या जिल्ह्यांना धान्य नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) मनमाड येथील एफसीआयच्या गोदामातून पुरवले जात आहे.त्याचा परिणाम नाशिककरांना नियमित धान्यपुरवठा होण्यासाठी अडचणी निर्माण करत आहे.दुकानदारांना वितरणाची मुदत ही ऑनलाईन पॉस मशीनमध्ये केंद्र सरकारकडूनच अपलोड केलेली असते. त्यामुळे वेळेत धान्य उचल न झाल्याने ते दुकानात पोहोचत नाही आणि याच दरम्यान ई-पॉस मशीनही बंद होऊन जाते. परिणामी वारंवार मुदतवाढ घ्यावी लागते. यात नाशिककरांना (Nashik) आता आपल्या हक्काच्या धान्यापासून मागील तीन महिन्यांपासून वंचित राहावे लागत आहे.

नोव्हेंबर महिन्यात अवघे २२ टक्के तर डिसेंबरमध्ये केवळ ९ टक्केच धान्य नाशिककरांना उचलता आले. त्यामुळे अपेक्षित असलेले अनुक्रमे ७८ आणि ९१ टक्के धान्य एफसीआयच्या गोदामातून पुरवठा विभागाच्या गोदामात आले नाही आणि तेथून दुकानदारांना आणि पर्यायाने ग्राहकांपर्यंत हे धान्य पोहोचत नसल्याने त्यांची ओरड आता सुरू झाली आहे.सोबतच धान्य वितरणासाठी इंटरनेटचा प्रॉब्लेम, ई-पॉस मशीनचा प्रॉब्लेम आणि पुढे धान्य वितरणाची मुदतही संपुष्टात येत असल्याने तीन महिन्यांपासून हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे दुकानदार आणि कार्डधारक (Cardholder) यांच्यामध्येही वाद होत आहेत. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

यामुळे नाशिकला गैरसोय

नाशिकला दरमहा २१,५०० मॅट्रिक टन इतके धान्य लागते तर धुळ्याला ८,५०० मेट्रिक टन आणि नंदुरबारला ७ हजार मेट्रिक टन इतक्या धान्याची दरमहा आवश्यकता असते. म्हणजे दोन्ही जिल्ह्यांचे मिळून १५,५०० मेट्रिक टन इतकेच धान्य आहे. नाशिकचे या दोन्ही जिल्ह्यांच्या एकत्रित क्षमतेपेक्षाही अधिक आहे. धान्य उचलण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी असतो. या पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रत्येकी ३० प्रमाणे दोन्ही जिल्ह्यांना आवश्यक धान्याची उचल होते. नाशिकला मात्र ६५ वाहने रोज उचल होणे आवश्यक असताना अवघे ३० ते ३५ ट्रक मिळत असल्याने ५०टक्के तुटवडा होत आहे.

गोदामात कामगारवाढ हवी

मनमाडच्या गोदामातून या दोन्ही जिल्ह्यांना धान्य देण्यासाठी वाहने उपलब्ध आहेत. परंतु त्या प्रमाणात कामगार किंवा हमाल किंवा माथाडी कामगार हे उपलब्ध नाहीत. त्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये धान्याची उचल ट्रकमध्ये होत नाही. यासाठी मी एफसीआयच्या रिजनल मॅनेजरची भेट घेऊन त्यांना त्वरित यात तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...