नाशिक | प्रतिनिधी | N ashik
कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) विसापूर येथील दीपाली केवळ माळी यांना प्रसूतीसाठी दि. ६ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कळवण उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी बाळाला जन्म दिला. दि. ९ जून रोजी दुपारच्या सुमारास आईने बाळाला दूध पाजल्यानंतर काही वेळाने बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी उपचार केले.
यावेळी बाळाची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास बाळाला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी रुग्णवाहिक। बोलविण्यास सांगितले. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका कर्मचा-यांशी संपर्क साधण्यात आला. परंतु सहा तास उलटून ही रूणवाहिका उपलब्ध झाली नाही.
परिणामी उपचारासाठी वेळेत हलविणे शक्य न झाल्याने रात्री ९ वाजेच्या सुमारास नवजात बालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतम नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत संबंधित डॉक्टर व रुग्णवाहिका सेवेशी संबंधित कर्मचान्यांवर गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मयत बालकाचे आई-वडील दोघेही मूकबधिर आहेत.
कळवण उपजिल्हा रुग्णालयात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
डॉ. नितीन शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे आमच्या बाळाचा जीव गेला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी.
रंजनाबाई माळी, नातेवाईक
रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही रुग्णालयाची जबाबदारी होती. मात्र तसे न करता माझ्या अशिक्षितपणाचा फायदा घेत कोणतीही माहिती न देता कागदपत्रांवर अंगठा घेण्यात आला.
भागाबाई सोनवणे, मयत बाळाची आजी




