सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungigad
सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्त्याच्या (Saptashrungigad and Nanduri Ghat Road) काँक्रिटीकरणासाठी हा मार्ग येत्या १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश कळवणच्या (Kalwan) उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, पर्यायी मार्ग उपलब्ध न करता रस्ता तब्बल १६ दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि भाविकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
कामाच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव व काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रस्ता बंद (Road Close) ठेवणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, पर्यायी रस्ता नसल्याने गडावरील दैनंदिन जीवन, रोजगार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि गडावर येणाऱ्या भाविकांच्या (Devotees) ये-जा करण्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे विकासाला विरोध नाही, पण नागरिकांना वेठीस न धरता टप्प्याटप्प्याने काम करावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
कामासाठी रस्ता बंद करायचा असेल तर पर्यायी मार्ग, आपत्कालीन वाहतूक आणि अत्यावश्यक सेवांसाठी योग्य व्यवस्था केली पाहिजे. नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला गेला पाहिजे. आमचा विकासकामांना विरोध नाही; पण विकासाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरू नये.
संदीप बेनके (सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य)
रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे ही काळाची गरज असून विकासाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, रस्ता पूर्णपणे बंद केल्याने नागरिक, व्यापारी, रुग्ण व भाविकांची मोठी अडचण होणार आहे. प्रशासनाने टप्प्याटप्प्याने काम करून रस्ता बंद न करता पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी.
राजू गवळी (स्थानिक नागरिक तथा ग्रामपंचायत सदस्य)




