नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त (दि. ३१) त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून शहर व ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) कडेकाेट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर महामार्गावर (Trimbakeshwar Highway) खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, भाविकांची वाहतूक सीबीएस येथील बस स्थानकापासून खंबाळे वाहनतळापर्यंतच केली जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीची आणि गर्दी नियंत्रणाची चाचपणी या निमित्ताने पोलिसांकडून केली जाणार असल्याने सर्व यंत्रणा अलर्ट आहेत.
शहरात खोदलेल्या रस्त्यांमुळे (Roads) प्रमुख शिव मंदिरांलगत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पाेलीस अधिक्षक डाॅ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व ग्रामीण पोलिसांच्या पथकांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे. त्यानुसार सातपूर (Satpur) येथील अमृत गार्डन आणि त्र्यंबकेश्वर महामार्गावरील महिरावणी येथून जव्हार, पालघर आणि गिरणारेकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येईल.
होल्ड अँड रिलीज
सन २००३ च्या सिंहस्थात ४ लाख, तर २०१५ मध्ये २० लाख भाविकांनी हजेरी लावली होती. २०२६-२७ च्या सिंहस्थात पर्वणीच्या दिवशी १ कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त कुंड आणि ब्रह्मगिरी फेरीच्या रांगांमध्ये होल्ड अँड रिलीज पद्धतीची चाचपणी केली जात आहे. गर्दी जास्त असल्यास भाविकांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले जाईल आणि मध्यम गर्दीच्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडले जाईल. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन, कुशावर्त स्नान आणि कलश दर्शनासाठी स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या आहेत.
२८० जादा बसेसचे नियोजन
- तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान नाशिक विभागाकडून २८० जादा बसेस सोडण्यात येत आहेत.
- नाशिक ते त्र्यंबक: १८५ बसेस (नवीन सीबीएस/ठक्कर बाजार)
- खंबाळे ते त्र्यंबक: ६५ बसेस
- अंबोली, पहिने व घोटी ते त्र्यंबक: प्रत्येकी १० बसेस
- नियमित १७० फेऱ्यांव्यतिरिक्त या बसेस चालतील. साध्या बसचे भाडे ६० रु. व ई-बसचे ७५ रु. राहील.
अशी असेल वाहतूक व्यवस्था
- नवीन मेळा बस स्थानकातून बसेस ठक्कर बाजारसमोरून आणि गोल्फ क्लबमार्गे त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ
- फेरीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या बसेस खंबाळे वाहनतळापर्यंतच जातील.
- खंबाळेतून भाविकांना शासकीय शटल बसेसने पुढे जावे लागेल.
- खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरकडे पूर्णतः बंदी.
- खासगी वाहने अमृत गार्डन (सातपूर) येथून श्रमिकनगर, गंगापूर गाव, गिरणारे आणि काश्यपी धरणावरून जव्हारकडे जातील.
- परतीच्या प्रवासासाठी पिंपळस, तळेगाव आणि पहिणेमार्गे
सुरक्षा व तांत्रिक नियोजन
- १२० कर्मचाऱ्यांची ४ स्वतंत्र पथके, ६० दुचाकींद्वारे गस्त
- निर्भया व दामिनी पथके, गर्दी नियंत्रणासाठी एआयचा वापर
- कंट्रोल रूम, वॉकी-टॉकी आणि सीसीटीव्ही नेटवर्कद्वारे लक्ष
- भाविकांनी सोबत कमीत कमी सामान आणावे
- मौल्यवान वस्तू आणणे टाळावे.
- वाहने केवळ नियोजित वाहनतळांवरच उभी करावीत
- संशयास्पद वस्तू आढळल्यास व मदतीसाठी डायल ११२ व र संपर्क साधावा.




