Monday, April 6, 2026
HomeनाशिकNashik News : पोलीस खात्यात 'कुंभपूर्व' हालचालींना वेग; कार्यकाळ पूर्ण करणारे बदलीच्या...

Nashik News : पोलीस खात्यात ‘कुंभपूर्व’ हालचालींना वेग; कार्यकाळ पूर्ण करणारे बदलीच्या दारात

शहर-ग्रामीणमध्ये नव्या चेहऱ्यांची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थाच्या (Simhastha) पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, आगामी नियुक्त्या ‘कुंभपूर्व तयारी ‘चा पाया ठरणार आहे.त्यामुळे या फेरबदलांकडे केवळ अंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया म्हणून नव्हे, तर सिंहस्थ व्यवस्थापनाच्या दृष्टीने निर्णायक टप्पा म्हणून पाहिले जात आहे. काही अधिकाऱ्यांनी सहा वर्षांचा, तर काहींनी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

- Advertisement -

ग्रामीण पोलीस दलातील (Rural Police Force) अपर पोलीस अधीक्षक, तर आयुक्तालयातील उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्णत्वास आला आहे. गृह विभागाकडून राज्यभरात वरिष्ठ पातळीवरील बदल्या होणार असल्याची चर्चा असून, नाशिकसह जिल्ह्यात कोणत्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली जाते यावर पुढील नियोजनाची दिशा ठरणार आहे. सिंहस्थाच्या तोंडावर कायदा सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि महिला सुरक्षेचे प्रश्न अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळे अनुभवी अधिकारी कायम ठेवले जातील की नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळेल, याची उत्सुकता आहे.

भारतीय पोलीस सेवेसह राज्य पोलीस सेवेतील काही अधिकाऱ्यांनी नाशिकसाठी इच्छा दर्शवल्याची माहिती आहे. दुसरीकडे, सध्याचे काही अधिकारी मुदतवाढीसाठी प्रयत्नशील असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, पोलीस महासंचालक कार्यालयातून उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या नियमित बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात बदलींचे आदेश अपेक्षित आहेत.

यंदा निर्णायक की धरसोड?

मागील वर्षी काही बदल्यांत अल्पावधीतच पदस्थापनेचे आदेश वारंवार बदलले गेले होते. एका ठिकाणी नेमणूक जाहीर होऊन काही दिवसांतच नवा आदेश काढला जात असल्याने टीका झाली होती. ऐच्छिक पोस्टिंगसाठी ‘सेटिंग्ज’ झाल्याच्या चर्चांनीही वातावरण ढवळून निघाले होते. यंदा मात्र सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट आणि ठोस आदेशातून नियुक्त्या होतील, अशी अपेक्षा आहे. नाशिक पोलीस दलातील आगामी फेरबदल हे केवळ पदांतर नसून, कुंभपूर्व व्यवस्थापनाची पहिली चाचणी ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : संगमनेरात 8 लाख 68 हजाराचे गोमांस जप्त

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरामध्ये कत्तलखाने (Slaughterhouses) उध्वस्त केल्यानंतर पुन्हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) रविवारी (दि.5) भारतनगर परिसरात छापा (Raid) टाकून 8...