Tuesday, July 21, 2026
HomeनाशिकNashik Shivsena UBT News : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; नाशिकमध्ये शिवसेनेची...

Nashik Shivsena UBT News : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; नाशिकमध्ये शिवसेनेची मानवी साखळी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wanghchuk) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) पक्षाच्या वतीने रविवारी (दि.१९) नाशिकमध्ये मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisement -

“इन्कलाब जिंदाबाद”, “युवा जागा हो, संघर्षाचा धागा हो”, “आजादी दो”, “राजीनामा द्या”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील केंद्र सरकारच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत त्यांना पाठिंबा (Support) जाहीर केला. यावेळी युवक-युवतींनी आपल्या भावना व्यक्त करत शिक्षण, रोजगार आणि लोकशाही मूल्यांबाबत चिंता व्यक्त केली.

युवकांनी संघटित होण्याचे आवाहन करत, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. देशाच्या भवितव्यासाठी सुशिक्षित नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.आंदोलनाला मार्गदर्शन करताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार वसंत गिते म्हणाले की, संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील आणि युवक-युवतींच्या प्रत्येक लढ्यात शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या आंदोलनात (Protest) जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते,ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे ,राहुल दराडे, संजय चव्हाण, शैलेश ढगे, योगेश गाडेकर, सचिन भांड, गुलजार कोकणी, बालवीर कौर, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आंदोलनात सहभागी युवक-युवतींनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा तसेच हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभाग नोंदविला.

ताज्या बातम्या