पंचवटी | प्रतिनिधी
दर तीन वर्षांनी येणारा आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जाणारा ‘अधिक मास’ सध्या सुरू आहे. या काळात गोदावरीत स्नान आणि दीपदान करण्याचे मोठे महत्त्व आहे. मात्र, पंचवटीतील मुख्य रामकुंडासह उपकुंडांमध्ये पाणीच नसल्याने भाविकांचे हाल होत आहेत. प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून येथील दीप विक्रेत्यांनी स्वखर्चातून गोरेराम कुंडात वर्गणी काढून, तात्पुरता बंधारा बांधला. आणि पाणी अडवून भाविकांची सोय केली आहे.
रामकुंड परिसरामध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आणि धार्मिक विधींवर अवलंबून असलेल्या कुटुंबांनी आजवर तब्बल ४ सिंहस्थ कुंभमेळे अनुभवले आहेत. कुंभमेळ्यासारख्या महासोहळ्यात लाखो भाविकांचे व्यवस्थापन अनुभवणाऱ्या या नागरिकांनी, आजवरच्या इतिहासात अधिक मासासारख्या पवित्र सणादरम्यान रामकुंडाची अशी दुरवस्था आणि पाण्याचे दुर्भिक्ष कधीच पाहिले नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कॉकरोच जनता पार्टीवर आणखी एक कारवाई; एक्स, इन्स्टा, नंतर आता ‘या’ माध्यमावर कारवाई
अधिक मास हा तीन वर्षांतून एकदा येणारा मोठा सण असूनही प्रशासनाने याबाबत कोणतीही पूर्वतयारी किंवा उपाययोजना केली नसल्याचे निदर्शनात आले आहे. अधिक मासानिमित्त देशभरातून हजारो भाविक रामकुंडावर अस्थी विसर्जन, दशक्रिया विधी, नारायण नागबली आणि विशेषतः गोदावरीत द्रोण दीप (दिवे) वाहण्यासाठी येत असतात. परंतु, कुंडात पाणीच उपलब्ध नसल्याने भाविकांनी स्नान कुठे करावे आणि दीपदान कुठे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक विधीच होत नसल्याने येथील फुलविक्रेते आणि दिवे विक्रेत्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
प्रशासनाकडून पाणी सोडण्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने, अखेर येथील कष्टकरी महिला आणि दिवे विक्रेत्यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून स्वखर्चाने गोरेराम कुंडात माती आणि दगडांचा तात्पुरता बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे थोडे पाणी अडवले गेले असून, तेथे भाविक कसेबसे दीपदान करत आहेत. आपल्या हक्काच्या पवित्र तीर्थक्षेत्रावर पोट भरण्यासाठी आम्हाला स्वतःच्या खचनि बंधारे बांधावे लागत आहेत, हे नाशिकच्या वैभवाला काळिमा फासणारे आहे, अशी खंत स्थानिक विक्रेत्यांनी व्यक्त केली. या गंभीर प्रकारानंतर आता तरी महानगरपालिका आणि संबंधित पाटबंधारे विभाग जागे होणार का ? अधिक मासासाठी रामकुंडावर तात्काळ पाण्याची सोय करून या ७० कुटुंबांना न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.




