नाशिक | Nashik
बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Citizens) मदत करणाऱ्यांची कधीही गय केली जाणार नाही. बांगलादेशी नागरिकांना कागदपत्री पुरावे मिळण्यासाठी कोलकत्तामधूनच मदत होते, त्यामुळे त्यांना भारतात वास्तव करण्याची संधी मिळते, असा दावा राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम (State Minister Yogesh Kadam) यांनी केला आहे. राज्यमंत्री कदम हे आज (मंगळवारी) नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी यावेळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले की,” बांगलादेशी नागरिक हे देशाच्या (Country) सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असून महायुती सरकारचे (Mahayuti Government) या धोक्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे सुरू झाले आहे. राज्यातील महायुतीचे सरकार कदापीही हे सहन करणार नाही. मालेगावमधील प्रकरणांमध्ये ही बाब स्पष्ट झाली असून बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची शासन गय करणार नाही असा इशारा यावेळी मंत्री कदम यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की, “राज्यातील तहसीलदार व इतर सहवर्गातील अधिकाऱ्यांनी जन्म दाखले देण्याच्या प्रक्रियेला विरोध केला असून त्या प्रकरणात हा अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे. त्यावर अजूनपर्यंत शासनापर्यंत हे निवेदन आले नसून ते मिळाले तर योग्य विचार केला जाईल. तसेच महसूल विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्व स्तरावरचे प्रयत्न करीत असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील सोडविले जातील असेही मंत्री योगेश कदमांनी स्पष्ट केले.
तसेच मंत्री बदलण्याच्या प्रश्नावर बोलताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, “राज्यामध्ये महायुतीचे सरकार भक्कम असून वैचारिक मतभेद देखील नाही. जे काही वाद आहेत ते अपेक्षेचे आहेत आणि अपेक्षा व्यक्त करणे यामध्ये कोणतीही चूक नाही. रत्नागिरीच्या संदर्भामध्ये बोलायचे झाले तर याठिकाणी शिवसेनेचे तीन, भाजपचा एक आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. या तत्त्वाप्रमाणे राष्ट्रवादीला (NCP) गेलेले पालकमंत्रीपद हे शिवसेनेने अपेक्षा करून घेतले तर काय वाईट आहे. मंत्री भरत गोगावले हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत,असे ते म्हणाले. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मात्र त्यांनी सोयीस्कर मौन बाळगत याबाबत वरिष्ठ योग्य ते निर्णय घेतील, असे म्हटले.
ते पुढे म्हणाले की, राज्यामध्ये अल्पवयीन मुलांचे (Minors) गुन्हेगारी येण्याचे प्रमाण वाढत असल्याची बाब चिंताजनक असून आता राज्य सरकार त्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न करत आहेत. या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी काही कॅम्पेन राबवता येईल का या दृष्टिकोनातूनही विचार करत आहोत. राज्यामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी अजून काही विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृहविभाग (Home Department) करत आहे, असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
नाशिक पोलीस आयुक्तालयाचे केले कौतुक
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik Police Commissionerate) कारभाराबाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “नाशिक पोलीस आयुक्तालयाचे कामकाज हे अतिशय चांगले चालू आहे. आत्तापर्यंत सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात अतिशय समाधानकारक कारवाई आहे. अमली पदार्थ विक्री आणि सेवन प्रकरणांमध्ये अजून अडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाचा विस्तार करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव पाठवला गेला असून यावरती योग्य ती कारवाई केली जाईल, मात्र मालेगाव पोलीस आयुक्तालय व्हावे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि तो विचाराधीनही नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.