Monday, September 14, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिकमध्ये UPSC परीक्षेला उशीर झाल्याने प्रवेश नाकारला; विद्यार्थ्यांसह पालकांचा...

Nashik News : नाशिकमध्ये UPSC परीक्षेला उशीर झाल्याने प्रवेश नाकारला; विद्यार्थ्यांसह पालकांचा संताप, प्रशासनाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

नाशिक | Nashik

शहरात आज (रविवारी) केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) देशपातळीवर ‘सीडीएस (२)’ आणि ‘एनडीए व एनए (२)’ या महत्त्वाच्या परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, नाशिकमधील के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी प्रवेशावरून मोठा गोंधळ उडाला. अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या उशिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी केंद्राबाहेर तीव्र निदर्शने केली.

- Advertisement -

दरम्यान, आज परीक्षा केंद्राबाहेर (Exam Centre) तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. तसेच स्पर्धा परीक्षांचे नियम कठोर असणे आवश्यक असले, तरी केवळ दोन-तीन मिनिटांच्या उशिरामुळे विद्यार्थ्यांचे (Student) संपूर्ण वर्ष आणि करिअर धोक्यात येणे योग्य आहे का?अशी चर्चा आता सर्वत्र सुरू असून यावर स्थानिक पातळीवर खंत व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

परीक्षेसाठी सकाळी ९:३० वाजताची रिपोर्टिंग वेळ निश्चित होती. मात्र, शहरातील खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अवघ्या काही सेकंदांपासून ते २ ते ३ मिनिटांचा उशीर झाल्याचे काही विद्यार्थ्यांनी म्हटले. त्यानंतर परीक्षा केंद्र व्यवस्थापनाने वेळेचे कारण देत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना आत सोडण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे वर्षानुवर्षे कठोर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर परीक्षा न देताच परतण्याची दुर्दैवी वेळ आली.

इतर केंद्रांवरील नियम

दरम्यान इतर काही केंद्रांवर ९:४५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असताना, याच केंद्रावर एवढी कठोर भूमिका का घेतली गेली, असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला. “केवळ काही सेकंदांच्या उशिरामुळे आमचा शेवटचा प्रयत्न वाया जात आहे,” असे म्हणत विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर आर्त विनवणी केली.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

या संपूर्णवादावर प्रशासनाची बाजू स्पष्ट करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “यूपीएससीच्या परीक्षांचे नियम अतिशय कडक असून त्यांचे नियंत्रण केंद्र स्तरावरून होते. निवडणुकीच्या धर्तीवर येथे वेळेचे तंतोतंत पालन केले जाते, त्यामुळे गेट बंद झाल्यावर स्थानिक प्रशासन यात हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच, विद्यार्थ्यांनी केलेले रस्ते खराब असल्यामुळे उशीर झाल्याचे दावे प्रशासनाकडून फेटाळण्यात आले असून, वेळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक केंद्रावर ७१ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती

एकीकडे प्रवेशावरून झालेल्या या वादाचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला असला, तरी यंदाच्या या परीक्षांना नाशिकमध्ये (Nashik) विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.समोर आलेल्या आकडेवारीनुसार नाशिक केंद्रावर एकूण ४,३७५ परीक्षार्थींपैकी ३,११३ उमेदवार (Candidate) उपस्थित होते. तर १,२६२ उमेदवार गैरहजर होते. साधारणपणे अशा स्पर्धा परीक्षांमध्ये ५० टक्के पर्यंत असणारी उपस्थिती, यंदा नाशिक केंद्रावर ७१.१५ टक्क्यांहून अधिक नोंदवली गेली.

ताज्या बातम्या

Nashik News : गंगापूर रोडवर झाडांची अनधिकृत छाटणी; काही झाडे बुडापर्यंत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर रोडवरील (Gangapur Road) काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान शुक्रवारी व शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी झाडांची अनधिकृतपणे छाटणी केल्याचा...