नाशिक | Nashik
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘सेवाकर्मी प्लस’ या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने (Shabari Tribal Finance and Development Corporation) ‘सार्वजनिक उपक्रम’ कंपनी संवर्ग या श्रेणीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल महामंडळाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवार, दि. २८ मार्च रोजी मुंबईतील (Mumbai) सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शबरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती लीना बनसोड (भाप्रसे) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल (भाप्रसे) उपस्थित होते.
हे देखील वाचा : Nashik News : ‘१५० दिवस ई-गव्हर्नन्स’ उपक्रमात नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात अव्वल; आयुक्त संदीप कर्णिक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
या यशाबद्दल व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (Leena Bansod) महामंडळाच्या महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या कडक मूल्यमापनात शबरी महामंडळाने १०० पैकी ८४ गुण मिळवून प्रशासकीय गतिमानतेत राज्यात अव्वल स्थान मिळवले. या यशात प्रामुख्याने ९ घटकांचा समावेश होता. यामध्ये सेवा कर्मचारी प्रशिक्षण: कर्मचाऱ्यांचे iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण आणि सेवा पुस्तके अद्ययावत करणे. आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे. ज्येष्ठता सूची, पदोन्नती आणि बिंदूनामावलीची तंतोतंत अंमलबजावणी यांसारख्या विषयांचा समावेश होता.
हे देखील वाचा : Nashik APMC News : नाशिक बाजार समितीत गुंडांचा हैदोस; सभापतींसह संचालक आक्रमक
दरम्यान, केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर आदिवासी बांधवांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महामंडळाने ‘शबरी नॅचरल्स’ (Shabari Naturals) हा ब्रँड विकसित केला आहे. या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे या ब्रँडची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता अधिक वाढणार असून, आदिवासी उत्पादने जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
हा पुरस्कार म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे. या यशामुळे आदिवासी विकास आणि विपणन व्यवस्था अधिक बळकट करण्याची नवी ऊर्जा मिळाली असून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
लीना बनसोड (भाप्रसे), व्यवस्थापकीय संचालक, शबरी महामंडळ.




