नाशिक | Nashik
राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्तम पोलीस आयुक्त कार्यालय म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयाने (Nashik Police Commissionerate) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. डिजिटल सेवा, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालयाने ही कामगिरी साध्य केली.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल (भाप्रसे), पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून पारदर्शक आणि वेगवान प्रशासन देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना नाशिक पोलीसांनी दिलेली ही साथ कौतुकास्पद ठरली आहे.ई-गव्हर्नन्स या उपक्रमांतर्गत विविध शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणे, तक्रार नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हे नियंत्रण व तपास प्रक्रियेत गती आणणे यावर विशेष भर देण्यात आला होता.
दरम्यान, या यशाबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) आणि संपूर्ण पोलीस दलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. तर नाशिक पोलिसांनी हा पुरस्कार एक आव्हान म्हणून स्वीकारत असून, या गतीला अधिक बळ देत पुढे जाण्यासाठी, डिजिटल सुधारणा अधिक सखोल करण्यासाठी आणि नागरिक-केंद्रित, तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगचा दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय अजून खूप पल्ला गाठायचा असून, याबाबतची दिशा स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.




