नाशिक | प्रतिनिधी | Nashik
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून (District Government Hospital) शनिवार (दि.४) रोजी पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाच्या मातेशी ओळख वाढवत एका संशयित महिलेने (Woman) ऐन डिस्चार्जच्यावेळी मातेच्या डोळ्यादेखत बाळ चोरी करुन पळ काढल्याची घटना घडली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड व गुन्हेशाखा युनिट एकचे पथक दाखल झाले होते. यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवली असता अवघ्या काही तासातच चोरी गेलेले बाळ नाशिक जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नाने आईच्या कुशीत आले. त्यामुळे आईला (Mother) काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, सपना मराठे असे बाळ चोरलेल्या महिलेचे नाव असून स्वतःला बाळ (Baby) होत नसल्याने तिने हे बाळ चोरल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बाळ चोरतांना ही महिला जिल्हा रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला सदर महिलेचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत झाली.