नाशिक | Nashik
उत्तर महाराष्ट्राच्या (Uttar Maharashtra) प्रशासकीय सक्षमीकरणाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्र शासनाने स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’च्या (Nashik Postal Region) स्थापनेला अखेर मंजुरी दिली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या मागणीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या निर्णयामुळे नाशिकसह मालेगाव, धुळे, जळगाव आणि भुसावळ या पाच टपाल विभागांचा समावेश स्वतंत्र प्रादेशिक क्षेत्रात होणार आहे.
भुजबळांनी मानले आभार
केंद्र शासनाच्या (Central Government) टपाल विभागाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत ज्ञापन जारी करून या प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील टपाल सेवा, पार्सल वितरण आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार मानले आहेत.
वाहतूक आणि दळणवळणाच्या वाढत्या सुविधांच्या दृष्टीने फायद्याचे
नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांचा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास, व्यापार-व्यवसायाचा विस्तार तसेच वाहतूक आणि दळणवळणाच्या वाढत्या सुविधा लक्षात घेता उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र टपाल क्षेत्राची आवश्यकता होती. मात्र, यापूर्वी नाशिक आणि मालेगाव हे टपाल विभाग नवी मुंबई टपाल क्षेत्राशी, तर धुळे, जळगाव आणि भुसावळ हे विभाग छत्रपती संभाजीनगर टपाल क्षेत्राशी संलग्न होते. उत्तर महाराष्ट्रातील परस्परांशी भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या जोडलेल्या विभागांचे प्रशासन वेगवेगळ्या प्रादेशिक कार्यालयांमार्फत चालत असल्याने समन्वय आणि कामकाजाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती.
केंद्रीय मंत्री सिंधिया यांना पत्र पाठवून केली होती मागणी
ही बाब लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवून स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्र स्थापन करण्याची आग्रही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या गतिशक्ती धोरणाच्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील टपाल व्यवस्थेचे एकत्रित नियोजन आणि अधिक सुलभ प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली होती. त्यानंतरही १७ जुलै २०२६ पर्यंत त्यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर केंद्र शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेत स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्राला मंजुरी दिली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील २३० टपाल कार्यालयांच्या कामकाजाचे नाशिकमधून संचलन
नव्या निर्णयानुसार नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव आणि भुसावळ या पाच टपाल विभागांचा स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील २३० टपाल कार्यालये आणि १,५०६ शाखा टपाल कार्यालयांच्या कामकाजाचे संचलन नाशिकमधून केले जाणार आहे. या नव्या प्रादेशिक कार्यालयामुळे विविध विभागांमधील प्रशासकीय समन्वय वाढण्यास मदत होईल. टपाल सेवांचे नियोजन, पार्सल हाताळणी, वितरण व्यवस्थेचे व्यवस्थापन तसेच संबंधित विभागांमधील निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय नाशिक येथील टपाल विभागाच्या विद्यमान इमारतीतच सुरू करण्यात येणार असल्याने स्वतंत्र पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर नव्याने व्यवस्था उभारण्याची आवश्यकता भासणार नाही आणि प्रशासकीय कामकाज सुरू करण्यास सुलभता येईल.
टपाल यंत्रणा सुसंगत करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा टप्पा ठरणार
उत्तर महाराष्ट्रात कृषी, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि सेवा क्षेत्राचा विस्तार होत आहे. समृद्धी महामार्गासह रेल्वेचे विस्तृत जाळे आणि नाशिकमधील हवाई वाहतुकीशी संबंधित संधी यामुळे या भागात मालवाहतूक, पार्सल सेवा आणि लॉजिस्टिक व्यवस्थेचे महत्त्व वाढत आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्राची स्थापना हा केवळ प्रशासकीय पुनर्रचनेचा निर्णय नसून, बदलत्या आर्थिक गरजांशी टपाल यंत्रणा सुसंगत करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.या निर्णयाचा लाभ शेतकरी, व्यापारी, उद्योजक, लघुउद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना होण्याची अपेक्षा आहे. टपाल सेवांचे व्यवस्थापन अधिक सुलभ झाल्यास ग्रामीण व शहरी भागांतील कार्यालयांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होईल. तसेच पार्सल आणि लॉजिस्टिक सेवांच्या नियोजनाला अधिक प्रभावी दिशा मिळू शकेल.
उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय
स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्राच्या मंजुरीमुळे उत्तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय गरजांना केंद्र स्तरावर मान्यता मिळाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून साकार झालेला हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.या मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचे आभार मानले. उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना अधिक सक्षम प्रशासकीय सुविधा मिळाव्यात, सार्वजनिक सेवांचे कामकाज अधिक सुलभ व्हावे आणि या भागाच्या विकासाला गती मिळावी, यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.




