मुंबई | Mumbai
राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे १४ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील ३३ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्यापासून ते आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांची मालमत्ता ९० दिवसांत जप्त करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मोफत धान्य (अन्न व नागरी पुरवठा विभाग) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील (डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या) 33 जिल्ह्यांतील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य (3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू) मिळणार आहे.
नर्मदा-तापी वळण योजना (जलसंपदा विभाग) : नंदुरबार जिल्ह्यातील या योजनेसाठी 5 हजार 548 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. सहा वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे 26 हजार 526 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून 11.50 मेगावॉट वीजनिर्मितीही केली जाईल.
आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई (गृह विभाग) : ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी (MPID) न्यायाधिकरण स्थापन केले जाणार असून, 90 दिवसांत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा असेल. यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ (वैद्यकीय शिक्षण विभाग) : आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EBC, SEBC, EWS) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ मिळणार आहे.
शिक्षकांसाठी आर्थिक सुविधा (शालेय शिक्षण विभाग) : शालार्थ प्रणालीत समाविष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
खासगी अनुदानित शाळांसाठी कायदा (शालेय शिक्षण विभाग) : खाजगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी सर्वसमावेशक असा ‘महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, 2026’ च्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली आहे.
ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग (वैद्यकीय शिक्षण विभाग) : खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांमधील पूर्णवेळ ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मान्यता मिळाली आहे.
कामगार कायद्यात सुधारणा (कामगार विभाग): महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे.
अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती (वैद्यकीय शिक्षण विभाग) : राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, 2021 (NCAHP कायदा) मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्याच्या विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली आहे.
महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (महसूल विभाग): महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी ‘रेव्हेन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम’ लागू होणार असून ‘एक जिल्हा एक अपील’ तरतुदीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा केली जाईल.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा (महसूल विभाग): अभिनिर्णय फी आणि अपील फीच्या दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मुद्रांक अधिनियम कलम 32 (ब) आणि 53 (1अ) मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे.
विद्यापीठ अधिनियमात एकसमानता (उच्च व तंत्र शिक्षण विभाग): कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (रामटेक) अधिनियम 1997 आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) अधिनियम 1989 मधील कुलसचिव नियुक्ती, समित्या आणि लेखे यांच्या परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी सुधारणा केली जाणार आहे.
लोकसेवा हक्क अधिनियमात सुधारणा (सामान्य प्रशासन विभाग): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील तरतुदींच्या सुधारणेस मान्यता देऊन हे विधेयक विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी दिली आहे.
मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन (महसूल विभाग): नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.




