नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
गणरायाला निरोप देण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर (Family) नियतीने काळाचा घाला घातला. गणपती विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) घरकुल योजना परिसरातील खदानीजवळ गेलेल्या रिक्षाचालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. संदीप खणपटे असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. गुरुवारी (दि. २५) सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. तब्बल रात्रभर शोध घेऊनही हाती न लागलेला त्यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता शोध पथकाच्या हाती लागला.
संदीप खणपटे हे घरकुल योजना परिसरातील रहिवासी असून, रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गणपती विसर्जनासाठी ते खदानीतील पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्यात बुडाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने मोहीम सुरू करण्यात आली. खदानीतील पाण्याची खोली आणि तळाशी असलेल्या दलदलीमुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू ठेवूनही संदीप यांचा ठावठिकाणा लागला नाही. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली.
अखेर सुमारे दहा वाजता त्यांचा मृतदेह शोध पथकाला आढळून आला. गणरायाला (Ganpati) निरोप देण्यासाठी घराबाहेर पडलेला संदीप परतलाच नाही, या धक्क्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संदीप यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, पत्नी आणि अवघ्या तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. वडिलांच्या मृत्यूची जाणीवही नसलेल्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणेश विसर्जनाच्या आनंदाला या दुर्दैवी घटनेने काळ्या दुःखाची किनार लाभली असून, घरकुल योजना परिसरावर शोककळा पसरली आहे.
मुलाला वाचवताना वडिलाचाही मृत्यू
पाण्यात बुडणाऱ्या आपल्या १४ वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी वडिलांनी जीवाची बाजी लावली; मात्र मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. संजय धोंडू सोनवणे (४८, रा. अक्षय चौक, नवीन नाशिक) आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री संजय सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. संजय सोनवणे हे रियल इस्टेटचा व्यवसाय करीत होते. गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास पहिणे बारी ते वाडीव-हे रस्त्यालगतच्या डोहात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला संजय सोनवणे हे मित्रांसोबत पहिणे बारी परिसरात फिरण्यासाठी गेले होते.
यावेळी ते डोहातील पाण्यात पोहत होते. वडील पाण्यात पोहत असल्याचे पाहून त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री यालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, काही वेळातच श्री पाण्यात बुडू लागला. आपला मुलगा पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच संजय यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मुलाला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने या प्रयत्नात संजय यांचाही तोल गेला आणि दोघेही पाण्यात बुडाले.




