
नाशिक | Nashik
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाचा फटका नाशिक शहरासह (Nashik City) ग्रामीण भागालाही बसला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून दुचाकीस्वार, पादचारी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) या महत्त्वाच्या मार्गावरील पिंपळगाव बहुला येथे रस्ता खचल्याने बुधवारी सकाळपासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा होऊन वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणातील पाणी पिंपळगाव बहुला (Pimpalgaon Bahula) येथील रस्त्यावर येऊन साचले. येथे असलेली जुनी मोरी आकाराने लहान असल्याने पाण्याचा योग्य निचरा होऊ शकला नाही. त्यात नव्याने टाकण्यात आलेल्या मोठ्या पाईपांमुळे आणि जुन्या छोट्या मोरीमुळे पाण्याचा प्रचंड दबाव निर्माण झाला. परिणामी रस्त्याला मोठा खड्डा पडून रस्ता खचला आणि वाहतूक ठप्प झाली.
रस्ता बंद झाल्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे (Trimbakeshwar Road) जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या.तसेच नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बससेवेलाही फटका बसला. विद्यार्थी, नोकरदार, भाविक आणि अन्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. खाजगी वाहनांचीही वाहतूक काही काळ बंद राहिल्याने अनेकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. या परिस्थितीत पिंपळगाव बहुला येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक युवकांनी पुढाकार घेत रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तसेच खचलेल्या भागाजवळ उभे राहून वाहनचालकांना सुरक्षित मार्गदर्शन केले.
विशेषतः दुचाकीस्वारांना काळजीपूर्वक मार्ग काढून देण्यात आला. त्यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. घटनास्थळी पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि संबंधित विभागाचे अधिकारी तत्काळ दाखल झाले. त्यांनी वाहतूक (Trafic) नियंत्रणासह सुरक्षिततेची उपाय योजना केली. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा वेगाने झाला आणि वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. संध्याकाळपर्यंत मार्ग पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, नागरिकांनी (Citizen) आवश्यक असेल तेव्हाच या मार्गाचा वापर करावा तसेच प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी मात्र पिंपळगाव बहुला येथील अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेची तातडीने सुधारणा करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.




