त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी (दि.३१ ऑक्टोबर) रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक येथे रामकुंडावर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील कुशावर्त कुंडावर होणार आहे.
दरम्यान, दोन्ही ठिकाणी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हा सोहळा पार पडणार आहे.या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात त्र्यंबकेश्वर शहरात कायदा व सुव्यवस्था, गर्दीचे नियंत्रण आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VIP) सुरक्षेसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
शुक्रवार (दि.३० ऑक्टोबर) रोजी सकाळी ६:०० वाजेपासून ते शनिवार (दि.३१ ऑक्टोबर) रोजी रात्री ८:०० वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेशबंदी (नो-एन्ट्री), पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था लागू करण्याचे अधिकृत आदेश अप्पर जिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी जारी केले आहेत. सिंहस्थ ध्वजारोहणासाठी व्हीआयपी, भाविक आणि नागरिकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून हे वाहतूक नियमन लागू करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस राहणार बंद; प्रशासनाकडून आदेश जारी
वाहतुकीचे नवे मार्ग आणि पार्किंग नियोजन
१) स्थानिक रहिवाशांच्या वाहनांसाठी मार्ग – त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना शहरात ये-जा करण्यासाठी रिंगरोड – निवृत्तीनाथ मंदिर – पोलीस स्टेशन – श्री लिहज हॉटेल – कुंभारतळे पार्किंग – जुना जव्हार फाटा या निश्चित मार्गाचा वापर करावा लागेल. ज्या स्थानिक रहिवाशांना नाशिककडे जायचे आहे, त्यांनी सापगाव मार्गाचा वापर करावा.
२) गावाबाहेरील वाहनांना पूर्ण प्रवेशबंदी (नो-एन्ट्री) – बाहेरील वाहनांना नवीन जव्हार फाटा तसेच रिंगरोड येथून त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून नो-एन्ट्रीचे फलक लावले जात आहेत.
३) अतिमहत्त्वाच्या (VIP) व्यक्तींसाठी मार्ग – नवीन जव्हार फाटा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – लक्ष्मीनारायण चौक या मार्गावरून केवळ शासन अथवा सक्षम प्रशासनाने विशेष पास दिलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल. इतर सर्व वाहनांसाठी हा मार्ग बंद राहील.
४) इतर सर्व सामान्य वाहनांसाठी मार्ग व पार्किंग – ज्या वाहनांना विशेष परवानगी नाही, त्यांना शहरातील गर्दीच्या व प्रतिबंधित भागात प्रवेश दिला जाणार नाही. अशा वाहनांना जुना जव्हार फाटा – श्री लिहज हॉटेल – कुंभारतळे पार्किंग – निवृत्तीनाथ मंदिर – रिंगरोड या मार्गाचा वापर करून कुंभारतळे येथे पार्किंग करावे लागेल.
नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईची इशारा
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तात्काळ वाहतूक दिशादर्शक व फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थितीनुसार या नियमांमध्ये शिथिलता किंवा आवश्यक बदल करण्याचे अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत. या वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) आणि मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या प्रचलित तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.




