जुने नाशिक | प्रतिनिधी Nashik
टाकळी रोड येथील सर्व्हिस रोडवर आज शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मासूम भिकण शाह (वय ४५, रा. फकीरवाडी, नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मासूम शाह हे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून दुचाकी (एमएच १५ एफवाय ९७०९) वरून सर्व्हिस रोडने द्वारकाच्या दिशेने घरी जात होते. त्याचवेळी टाकळी रोडकडून येणाऱ्या डंपरने (एमएच १२ एक्सएम ८५०४) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, शाह यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.पुढील तपास पोलीस करत आहेत.




