नाशिक । प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या (Nashik City) कचरा व्यवस्थापनात मोठी सुधारणा करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या काळात वाढणारा अतिरिक्त कचरा लक्षात घेता, पाथर्डी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता आता ११०० टन प्रतिदिन पर्यंत वाढविण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत आमदार पंकज भुजबळ (MLA Pankaj Bhujbal) यांनी पाथर्डी कचरा डेपोमधील समस्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर नगरविकास मंत्र्यांनी लेखी उत्तर देत शासनाची भूमिका स्पष्ट केली.
हस्थ काळात शहरात दररोज अंदाजे २०० ते ४०० मेट्रिक टन अतिरिक्त कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही गरज ओळखून प्रकल्पात खालील बदल केले जात आहेत. प्रिसॉर्टिंग, कंपोस्टिंग आणि आरडीएफ युनिट्समध्ये नवीन आणि अतिरिक्त मशिनरी बसवण्याचे काम सुरू आहे. सध्या प्रकल्पाची क्षमता ९०० मेट्रिक टन असून शहरातून दररोज ७५० ते ८०० टन कचरा जमा होतो.सिंहस्थ मेळ्यापूर्वी ही क्षमता ११०० टनांपर्यंत नेली जाईल. आमदार पंकज भुजबळ यांनी पाथर्डी येथील स्थानिक नागरिकांच्या समस्या मांडताना काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये यंत्रसामग्री वारंवार नादुरुस्त होत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. अनेक वर्षांपासून साचलेला कचरा नष्ट करण्यासाठी नियुक्त कंत्राटदाराने कामात विलंब केल्यामुळे दंडात्मक कारवाई झाली का? असा सवाल त्यांनी केला. १०० टक्के कचरा विलगीकरण न करणार्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई झाली आहे का, याचीही विचारणा त्यांनी केली.
दरम्यान, यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले की, 2017 पासून हा प्रकल्प खाजगी यंत्रणेमार्फत चालविला जात आहे. सध्या दैनंदिन जमा होणार्या संपूर्ण कचर्यावर शास्त्रीय प्रक्रिया केली जात असल्याने प्रदूषणाची समस्या उद्भवत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच, भविष्यातील गरजा लक्षात घेता ’वेस्ट टू एनर्जी’ किंवा ’मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी’ यांसारख्या प्रकल्पांबाबतही महानगरपालिका सकारात्मक पावले उचलत आहे.




