त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
पवित्र श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) होणारी भाविकांची (Devotees) प्रचंड गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा श्रावण महिन्यात कथित व अनधिकृत ‘व्हीआयपी’ (VIP) दर्शनावर पूर्णपणे बंदी (Close) घालण्यात आली असून, सामान्य भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा सह धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने यांनी निवेदनाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
शासकीय प्रोटोकॉलसाठी वेळ आणि संख्येचे बंधन
देवस्थान ट्रस्टच्या (Temple Trust) विश्वस्त मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, फक्त केंद्र, राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत शासकीय शिष्टाचार (Protocol) प्राप्त झालेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.
कोणत्या कालावधीत मंदिर बंद राहणार?
त्र्यंबकेश्वर मंदिरात १३ ऑगस्ट २०२६ ते १३ सप्टेंबर २०२६ या श्रावण मासाच्या काळात व्हिआयपी दर्शन बंद (VIP Darshan Close) असणार आहे. तर शासकीय व्हीआयपींना केवळ रात्री ८.०० वाजता निश्चित वेळेतच दर्शनासाठी प्रवेश मिळेल, असेही पत्रात म्हटले आहे. तसेच एका वेळी जास्तीत जास्त २० अति महत्त्वाच्या व्यक्तींनाच दर्शन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल, असे देखील देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
सामान्य भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी निर्णय
त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याने श्रावणात देश-विदेशातून लक्षावधी भाविक येतात. मंदिरात ओळख दाखवून किंवा अनधिकृत मार्गाने होणाऱ्या व्हीआयपी दर्शनामुळे रांगेतील सामान्य भाविकांना तासनतास ताटकळत राहावे लागते, तसेच प्रशासनावरही प्रचंड ताण येतो. हा त्रास वाचविण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देवस्थानने प्रथमच असा कडक निर्णय घेतला आहे. देवस्थान ट्रस्टने सर्व सरकारी, निमसरकारी व इतर विभागांना या नियमांची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.




