Thursday, June 11, 2026
HomeनाशिकWater Shortage : मालेगावी १६ गावे, ४८ वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; तीव्र तापमानाने...

Water Shortage : मालेगावी १६ गावे, ४८ वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; तीव्र तापमानाने पाणीटंचाईची झळ

खासगी विहिरींचे अधिग्रहण

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

उन्हाळ्याच्या उत्तरार्धात तापमानाचा आलेख उंचावत चालला असल्याने ग्रामीण भागात (Rural Area) पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. तालुक्यांतील (Taluka) १६ गावे व ४८ वाड्या-वस्त्यांमधील ३७,१९५ लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात असून यासाठी खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारत बेदे यांनी दिली.

- Advertisement -

चाढत्या उन्हाच्या प्रखरतेने शेत शिवारातील विहिरींनी (Well) पाण्याचा तळ गाठला आहे. अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने विंधन विहिरी व कूपनलिका बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते.

सद्यस्थितीत तालुक्यातील एरंडगाव, मेहणेसह परिसरातील इंदिरानगर, त्रिवेणी, शिवाजीनगर, हनुमाननगर, पाटीलवाडी, यमुनाबाईनगर, सुभाषनगर, बर्फमळा या वाड्यांवर टँकर सुरू करण्यात आले आहेत. सावकारवाडी येथील कांगणे वस्ती, शिवनगर, दत्तनगर, माधवनगर, रायजेनगर, गजानन वस्ती, पवार वस्ती, बागलाण वस्ती, धर्मनाथनगर, सरोदे वस्ती, अंधारे वस्ती, काळे वस्ती, लवके वस्ती, रायते बड़े वस्ती येथे येसगाव येथील खासगी विहीर अधिग्रहीत करून पाणीपुरवठा (Water Supply) केला जात आहे.

मांजरे गावासह तेथील पवार वस्ती, फुलेवाडी, इंदिरानगर, बंजारदेव वस्ती, झाडी गावांसह लगतच्या अभाळ वस्ती, फसाळे वस्ती, एकलव्य वस्ती, कोळेश्वर वस्ती, नेहरूनगर, पवार वस्ती, दुकळे वस्ती येथेही खासगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. जळगाव (नि) सह परिसरातील सहा वाड्यांवर टँकर सुरू करण्यात आले आहेत. घोडेगाव व परिसरातील शिंदे वस्ती, शेख वस्ती, नरोदे वस्ती, घोडेगाव चौकी येथेही पाणीपुरवठा करण्यासाठी मुथुरपाडे येथील विहीर अधिग्रहीत करण्यात येऊन त्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. चोंढी परिसरातील तीन वस्त्यांवर टँकर सुरू आहेत.

वऱ्हाणे गाव, वहऱ्हाणे पाडा, कजवाडे, रामपुरा, गारेगाव, ज्वार्डी बुद्रुक, दुधे, पोहाणे, नगाव गावात खासगी विहीर अधिग्रहीत करून टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. हरणबारी धरणातून मोसम नदीत पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने काही गावांतील पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे बापूसाहेब आहिरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...