नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Nashik NMC Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले दिसून आले. तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून सर्वच प्रमुख पक्षामध्ये तणाव जाणवत असला, तरी स्वतःला राजकारणातील बलाढ्य शक्ती म्हणून मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षात हा तणाव अधिक तीव्र स्वरूपात समोर आला. निष्ठावंत कार्यकर्ते आणि अलीकडेच पक्षात प्रवेश केलेले उमेदवार यांच्यातील संघर्ष निवडणूक कार्यालयाबाहेर उघडपणे दिसून आला. एकंदरीत नाशिक महानगरपालिका निवडणूक ही पक्षीय लढतीपेक्षा अधिक अंतर्गत संघर्ष, शक्तिप्रदर्शन आणि राजकीय गणितांची कसोटी ठरणार असल्याचे कालच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नाशकात भाजपमध्ये मोठा राडा; एबी फॉर्मवरून वाद, कार्यकर्ते आक्रमक
भाजपकडे (BJP) नाशिक १२२ महानगरपालिकेच्या जागांसाठी तब्बल बाराशेपेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी (Candidate) मागितली होती. त्यातच तिकीट वाटपापूर्वी इतर पक्षांतील काही दिग्गज नेत्यांना पक्षप्रवेश देण्यात आल्याने जुने कार्यकर्ते आधीच अस्वस्थ झाले होते. प्रत्यक्ष तिकीट वाटपात चार ते पाच विद्यमान नगरसेवकांसह अनेक जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलले गेल्याने नाराजीचा उद्रेक झाला. या परिस्थितीची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा हस्तक्षेप केवळ परिस्थिती सांभाळण्यापुरताच मर्यादित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या नाराजीचे पडसाद शहरातील विविध भागात उमटले.
हे देखील वाचा : Nashik NMC Election : महापालिकेच्या १२२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल; आज छाननी
शहरातील माजी नगरसेवक सतीश सोनवणे, कमलेश बोडके, शशिकांत जाधव तसेच माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह माजी मंडलाध्यक्ष व ज्येष्ठ सदस्यांना तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अंतर्गत नाराजीचा थेट परिणाम निवडणूक निकालावर दिसून येईल असा सूचक इशारा नाराजांनी व्यक्त केला आहे. याउलट, विरोधी महाविकास आघाडी तुलनेने एकसंघ दिसत असून तिकीट वाटपाचे नियोजन अधिक संतुलित झाल्याचे चित्र आहे. मात्र, अर्ज दाखल करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत परस्परांना आव्हान दिले.
एबी फॉर्मसाठी रडारड
एबी फॉर्म स्वीकारण्यासाठी शहराच्या बाहेर विल्होळी येथील व्हिजन व्हिला प्रकाशझोतात आला. इच्छुकांनी अक्षरशः रडत विनवण्या करत एबी फॉर्मची मागणी केली. अनेक निष्ठावानांना डावलल्याने आमदारांवर रोष व्यक्त केला जात होता. निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या बाहेर सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवार कैलास आहिरे यांच्यात बाचाबाची झाली, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
भाजपने माजी नगरसेवकांची कापली उमेदवारी
माजी महापौर अशोक मुर्तडक, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, कमलेश बोडके, सतीश सोनवणे, शाहीन मिर्झा, रूची कुंभारकर, शशी जाधव, वर्षा भालेराव, प्रियांका घाटे, अंबादास पगारे, दिलीप दातीर, पंडित आवारे, मीरा हांडगे, माजी स्वीकृत नगरसेवक श्यामला दीक्षित तसेच प्रशांत जाधव.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात
भाजप – ११८ – प्रभाग क्रमांक १४ मध्ये एकही उमेदवार दिलेला नाही
शिवसेना (शिंदे गट) – ८०
राष्ट्रवादी (अजित पवार) – ४१
शिवसेना (ठाकरे गट ) – ८२
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – ३१
मनसे – ३४
आप -३५
माकप – ०९
काँग्रेस – २२




