Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik NMC News : पाणी प्रश्नावर महासभेत ‌'हंडा आंदोलन‌'; भाजप नगरसेविकेने विचारला...

Nashik NMC News : पाणी प्रश्नावर महासभेत ‌’हंडा आंदोलन‌’; भाजप नगरसेविकेने विचारला प्रशासनाला जाब

पंचवटी-द्वारका वाद, सभागृहात जोरदार चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावरून नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेत जोरदार गदारोळ झाला. महापौर हिमगौरी आडके (Himgauri Aher-Aadke) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पंचवटी विभागातील भाजप नगरसेविका प्रियंका माने यांनी रिकामा हंडा घेऊन आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत त्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली.

- Advertisement -

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पंचवटीसह विविध उपनगरांतील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महासभेत पाणीप्रश्न गाजला. नगरसेविका माने यांनी हंडा घेऊन आंदोलन करत “नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना प्रशासन मात्र निष्क्रिय आहे,” असा आरोप केला.

दरम्यान, गुरुवारी (दि.०५) पंचवटीतील निलगिरी बाग जलकुंभावरून झालेल्या वादाची पार्श्वभूमीही महासभेत चर्चेत आली. पंचवटी भागातच कमी दाबाने पाणी मिळत असताना द्वारका परिसराला पाणीपुरवठा होत असल्याचा आक्षेप घेत माने यांनी समर्थकांसह जलकुंभावर जाऊन द्वारकाकडे जाणारा वाल्व काही काळासाठी बंद केला होता. यामुळे द्वारका परिसरातील पाणीपुरवठा काही काळ विस्कळीत झाला आणि या मुद्द्यावरून दोन्ही भागांतील लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण झाला होता.

या घटनेनंतर द्वारका व पंचवटी विभागातील भाजप नगरसेवकांनी जलकुंभावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत पुन्हा पाणीपुरवठा सुरू केला होता. पाणीपुरवठा विभागाने शहरातील वितरण व्यवस्थेत सुधारणा करून सर्व भागांना समतोल पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी अनेक नगरसेवकांनी केली. दरम्यान, पाणीप्रश्न गंभीर बनत असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांचा संताप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

चिमुकल्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी उद्या शाळांमध्ये

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर सोमवारपासून येणार आहेत. या नव्या शैक्षणिक पर्वाच्या मंगल...