नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) आज (सोमवारी) झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात भाजप ९, शिंदे सेना ०४, शिवसेना उबाठाला ०२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १ जागा मिळाली आहे. पक्षाच्या गट नेत्यांकडून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडे नावे सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर महापौरांनी स्थायीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली.
यामध्ये भाजपकडून माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड आणि मच्छिंद्र सानप यांना संधी मिळाली आहे. तर शिंदे सेनेकडून मनसेच्या मयुरी पवारांसह किरण गामणे, राहुल दिवे आणि रंजना बोराडे यांना तर शिवसेना उबाठाकडून भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर यांची वर्णी लागली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, भाजपकडून सभापती पदासाठी माधुरी बोलकर आणि मच्छिंद्र सानप यांचे नाव आघाडीवर आहे. तर मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदे सेनेसोबत गट नोंदणी केल्याने त्यांची पहिल्याच टप्प्यात स्थायीवर निवड झाली आहे. त्यामुळे त्यांनाही स्थायी समिती सदस्य पदासाठी लॉटरी लागली आहे.




