नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) निकालानंतर सर्वांचे लक्ष स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीकडे लागले आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लॉबिंग होत आहे. मात्र, वरिष्ठांकडून अद्याप काही सिग्नल न मिळाल्याने इच्छुकांचा हिरमोड होत आहे.
नाशिक महापालिकेत (Nashik NMC) यंदा एकूण दहा स्वीकृत नगरसेवक होणार असून, या जागांसाठी राजकीय वर्तुळात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. संख्याबळानुसार या दहा जागांचे वाटप होणार असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला सहा जागा तर शिवसेना शिंदे गटाला दोन आणि शिवसेना उ द्ध व बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस गटाला संयुक्तपणे दोन जागा मिळण्याची चिन्हे आहेत.
नाशिकमध्ये स्थानिक नेत्यांकडून आपापल्या समर्थकांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असली तरी अंतिम निर्णयाचा चेंडू आता मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात आहे. अनेक पराभूत दिग्गज माजी नगरसेवक आणि पक्षनिष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांनी या पदासाठी फिल्डिंग लावली आहे. विशेषतः ज्या प्रभागात मातब्बर नेत्यांचा निसटता पराभव झाला त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक हे पद संजीवनी ठरू शकते.
इच्छुकांची मांदियाळी
स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते. यात संबंधित व्यक्तीकडे सामाजिक, शैक्षणिक किंवा विशेष क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये मात्र अनेक राजकारण्यांनी आता या तांत्रिक निकषांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी निवडणुकीत पक्षासाठी काम केले, पण उमेदवारी मिळाली नव्हती किंवा जे पराभूत झाले अशा नावांची चर्चा सध्या रंगली आहे.
तणावाचे वातावरण
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात काही प्रमाणात तणावाचे चित्र आहे. विशेषतः काँग्रेसने एका जागेवर दावा केला असून, ठाकरे गटासोबतच्या जागावाटपाच्या सूत्रावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. दुसरीकडे, शिंदे गटातही अनेक दावेदार असल्याने कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




