Wednesday, February 19, 2025
HomeनाशिकNashik News : उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे संकेत

Nashik News : उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे संकेत

एकाच ठिकाणी पाच वर्षे घालवणारे हलवणार; काहींचे नियोजन सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पोलीस आयुक्तालयाने (Nashik Police Commissionerate) पोलीस शिपाई ते श्रेणी उपनिरीक्षक पदांपर्यंतच्या सेवकांच्या बदल्यांचे संकेत दिले आहेत. एकाच ठिकाणी पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी व पोलिसांची यादी आयुक्तालयाने मागवली आहे. त्यानुसार जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात संबंधित अंमलदारांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अंमलदारांनीही ‘पुढील नियोजन’ सुरू केले आहे. इच्छितस्थळी नियुक्तीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे कळते.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये आयुक्तालयाची सूत्रे हाती घेतल्यापासून ठराविक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेल्या पोलिसांना निलंबित करण्यात आले. निवडणूक (Election) काळात कर्तव्याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांनाही शिक्षा देण्यात आली. यासह ‘स्टॉप अँड सर्च कारवाईसह इतर महत्त्वाच्या कामगिरीत कसूर केल्याप्रकरणीही पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व पोलीस ठाण्यांच्या ‘प्रभारीं’ च्या बदल्या करुन आयुक्तांनी चांगलाच इशारा दिला होता. त्यामुळे सन २०२५ मध्ये होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांच्या आदेशांकडे पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचेही लक्ष आहे.

दरम्यान, शहरातील तेरा पोलीस ठाणे, चुंचाळे चौकी, सायबर पोलिसांसह इतर सर्व विभाग व शाखांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती आयुक्तालयाने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मागितली आहे. त्यात ३१ मे २०२५ पर्यंत एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेल्यांची यादी (List) मागवण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित अंमलदारांकडूनही बदल्यांसंदर्भात अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे. त्या अर्जानुसार विनंती बदल्यांना मंजुरी मिळणार की, आयुक्तालय स्वतःहून अंमलदारांना गरजेनुसार नियुक्त करणार याकडेपोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

अंमलदारांत नाराजीचा सूर

नाशिक शहरातील (Nashik City) तेरा पोलीस ठाणे, सहायक ते आयुक्त कार्यालय, वाहतूक व इतर शाखांमध्ये कित्येक वर्षांपासून काही अंमलदार अधिकारी त्याच जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. किंबहुना, अनेक कर्मचाऱ्यांची इतरत्र बदल होऊनही त्यांनी ‘अपेक्षित’ कामकाज सोडलेले नाही. यासह नवीन ठिकाणी नियुक्तीनंतरही तिथे ‘ठराविक’ कामांचाच अट्टहास धरणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यामुळे इतर अंमलदारांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होतो. यासह ‘मर्जीतल्या’ कर्मचाऱ्यांची बदलीही अपेक्षेप्रमाणेच होत असल्याने, त्यासंदर्भातही आयुक्तालयात वारंवार चर्चा ऐकू येतात. त्यामुळे सन २०२५ मध्ये होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये तरी ‘ठाण मांडलेल्यांना’ बदलण्यात येईल, अशी कुजबूज सुरू आहे.

गुन्हे नोंदीत घट

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर काखाईसंदर्भात काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी सूचना दिल्याचे समजते. मात्र, जुगार अड्डे, अवैध दारूविक्रीच्या गुन्हे नोंदीत निवडणुकीनंतर घट झाल्याचे दिसते. त्यातच अंबड पोलिसांच्या हद्दीत पुन्हा धंद्यांवरुन वाद सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. उपनगर, नाशिकरोड आडगाव, पंचवटी, म्हसरूळ पोलिसांच्या हद्दीतही संबंधितांना रोख लावण्याची नाशिककरांची अपेक्षा आहे. गंगापूर पोलिसांच्या हद्दीत नव्याने उभ्या राहणाऱ्या हॉटेलांमध्ये सर्रास अवैध दारु विक्री सुरू असल्याचे दिसते. परंतु, वरिष्ठांच्या किंवा बड्यांच्या नावाखाली पोलीस पथकांनाही काखाई करू दिली जात नसल्याची चर्चा आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या