Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political : सिन्नर तालुक्यात बदल घडवा; शरद पवार यांचे आवाहन

Nashik Political : सिन्नर तालुक्यात बदल घडवा; शरद पवार यांचे आवाहन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) सिन्नरची (Sinnar) जनता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या (Mahavikas Aaghadi Candidate) मागे उभी राहिली, त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा व आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना निवडून द्या, तालुक्यात बदल घडवा, तालुक्याच्या विकासासाठी मी सिन्नरकरांच्या पाठीशी उभा राहील, असे प्रतिपादन देशाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे (Uday Sangle) यांच्या प्रचारार्थ हुतात्मा चौक येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, ज्येष्ठ नेते निवृत्तीमामा डावरे, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, आदिवासींचे नेते सतीश पेंडाल, डॉ. डी. एल. कराड, गजानन शेलार, नितेश कराळे मास्तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, राजू देसले, गोकुळ पिंगळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संजय सोनवणे, संदीप शेळके यांच्यासह महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी हुतात्मा चौकाचे सभा स्थळ खच्चून भरले होते. शरद पवार यांनी तालुक्याशी एक वेगळे नाते असल्याचे सांगताना तत्कालीन आमदार शंकरराव वाजे, सूर्यभान गडाख, रुख्मिणीबाई वाजे, तुकाराम दिघोळे यांचा नामोल्लेख केला. त्यावेळी तालुक्यात औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी आपण स्वत: आलो होतो. उद्योगांची मुहूर्तमेढ त्याकाळात रोवली गेली. तालुक्यात रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांना सवलती दिल्यामुळे सिन्नरला उद्योग आले. तालुक्यात सेझ आला. मात्र, संपादित केलेल्या जमिनीवर एकही उद्योग आला नाही. त्याकडे सध्याचे सरकार ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. त्यासाठी अधिक पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.

सिन्नर तालुक्याची (Sinnar Taluka) प्रगती अधिक वेगाने होण्यासाठी आम्ही सर्व खासदार वाजे, उदय सांगळे यांच्या पाठीशी उभे राहू. त्यासाठी सत्तेत बदल करावा लागेल. तो बदल घडवण्याचे काम तालुक्यातील मतदारांनी करावे, असे आवाहन पवार यांनी केले. सिन्नरसाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा व विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. तालुक्यात बदल घडवणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगताना त्यांनी आज बेकारांची संख्या वाढली आहे. त्याकरता रोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे. तरुणांना शिक्षण घेऊन नोकर्‍या नाहीत. हे चित्र बदलायचे असेल तर राज्यातही बदल घडवण्याचे आवाहन खासदार पवार यांनी केले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे. विधानसभेत आपल्या हक्काचे नेतृत्व पाठवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सांगळे यांना निवडून देण्याचे आवाहन खासदार पवार यांनी केले.

राष्ट्रवादीचे (NCP) नेते नितेश कराळे यांनी केंद्र सरकारवर त्यांच्या शैलीत जोरदार टीका केली. देशात शेतकर्‍यांच्या शेतमालाचे भाव पाडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. शेतकर्‍यांच्या कोणत्याच मालाला भाव मिळणार नाही याची व्यवस्था केली. राज्यातील प्रकल्प गुजरातला नेले. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांच्या नोकर्‍या हिरावून घेण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेत फटका बसला. आता विधानसभेत झटका द्यावा, असे ते म्हणाले. तालुकाप्रमुख अ‍ॅड. संजय सोनवणे यांनी तालुक्याचे प्रश्न शरद पवार यांच्यापुढे मांडले. इंडिया बुल्स बंद असून ती सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. तालुक्यातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच मोठे उद्योग येथे आले पाहिजेत. नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात राबवला पाहिजे, असे ते म्हणाले.

सांगळे यांना निवडून आणण्यात हयगय करू नका : खा. वाजे

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे. विधानसभेत आपल्या हक्काचे नेतृत्व पाठवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सांगळे यांना निवडून देण्यात हयगय करू नका, असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे. लोकसभेत आपल्याला सिन्नर तालुक्याच्या जनतेने आशीर्वाद दिला, तसाच आशीर्वाद विधानसभेसाठी उदय सांगळे यांना द्यावा, असे आवाहन खासदार वाजे यांनी केले. महाविकास आघाडीने राज्यात लोकसभेच्या वेळी जे यश मिळवले, त्यातून महायुती सरकाराला 440 व्होल्टचा झटका बसला. हा झटका पुन्हा एकदा द्यावा. 20 मे रोजी तालुक्यातील जनतेने महाविकास आघाडीसाठी भरभरून मतदान केले. हा विजयाचा पाया होता. आता विधानसभेत 20 नोव्हेंबर रोजी त्यावर कळस चढवण्याचे आवाहन राजाभाऊ वाजे यांनी केले.

केवळ जात म्हणून पाहू नका

माझ्यावर जात म्हणून अन्याय करू नका, असे आवाहन सांगळे यांनी तालुक्यातील जनतेला केले. केवळ जात म्हणून नाही तर माझे विकासाचे व्हिजन विचारात घेऊन माझ्याकडे पाहावे. विकास योजना राबवण्यासाठी तालुक्यातील जनतेने आपल्याला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कोकाटे हे मागच्या निवडणुकीत केवळ शरद पवारांमुळे दोन हजार मतांच्या फरकाने निवडून आल्याचे सांगळे म्हणाले. जे सख्या भावाचे झाले नाही ते तालुक्याचे काय होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तालुक्यातील जनतेने आपल्यावर विश्वास टाकावा. अभिमान वाटेल, सर्वांना हेवा वाटेल असे काम करून दाखवेन. आपण आमदार झालो तर पुढचा आदिवासीदिन भव्य स्मारकाच्या समोर साजरा करून दाखवतो. तालुक्यात भव्य शिवसृष्टी उभारू, पाणी, उद्योग, रोजगार, स्मारके यासारखी असंख्य कामे तडीस नेणार असल्याचे उदय सांगळे यांनी यावेळी सांगितले.

कोकाटे यांनी शेतकर्‍यांचे पैसे बुडवण्याचे काम केले

विरोधी उमेदवार माणिकराव कोकाटे हे 20 वर्षांपासून जनतेचे सेवक नाही तर मालक असल्याप्रमाणे वागत आहेत. सिन्नरच्या उद्योगनगरीत एक इंचही जागेवर त्यांनी उद्योग आणला नाही. कोकाटें यांनीच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर सहा गुन्हे दाखल असल्याचे लिहिले आहे. यात एक आर्थिक बाबीच्या संबंधित फसवणूक केल्याचा गुन्हा आहे. हा गुन्हा जिल्हा बँक बुडाली त्यासंदर्भात असून यात हजारो शेतकर्‍यांचे पैसे बुडवण्याचे पाप कोकाटे यांनी केले असल्याची घणाघाती टीका महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांनी केली. सिन्नर शहरासाठी राबवलेल्या पाणीपुरवठा योजनेचा स्त्रोत कडवा धरणाऐवजी अन्यत्र हवा होता. त्यामुळे कडवा कॅनॉलवर अवलंबून असलेले तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांचे रोटेशन कमी झाले आहे. हे रोटेशन 72 दिवसांहून 21 दिवसांपर्यंत येऊन ठेपले आहे. क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शरद पवार साहेबांच्या हस्ते झाले. मात्र, आजपर्यंत त्या जागेवर एक वीटही रचली गेलेली नाही, हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याचा घणाघात सांगळे यांनी केला. याउलट आपण तालुक्यात डुबेरे येथे छत्रपती शिवाजी महाराज, नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथजी मुंढे, भगवान एकलव्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महात्मा ज्योतिबा फुले यांची स्मारके उभारली आहेत. तर भगवान बुद्धांचे आकर्षक बौद्धविहार विविध गावांत साकारले आहेत. प्रत्येक समाजाला व घटकाला सोबत घेऊन आजपर्यंत काम केले आहे. विविध गावांत अभ्यासिका सुरू केल्या आहेत. या अभ्यासिकेत अनेक युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचे सांगळे यांनी सांगितले. जिल्ह्यात काम करताना विद्यार्थी चळवळीपासून विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून 15 वर्षांपासून खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे केली असल्याचे सांगळे यांनी सांगितले. सिन्नर तालुका पवार साहेबांना मानणारा आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडतात. त्यांच्या व खासदार वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अजून विकास करायचा असल्याचे सांगळे म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या